श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद
कोल्हापूर : भारतीय संस्कृती आणि कायदा पूजा केलेली मूर्ती सजीव (जिवंत) आहे, असे मानतो. त्यामुळे कोणत्याही देवस्थानातील विश्वस्त हे देवतेच्या वतीने कारभार करतात. अशा प्रकारे जिवंत मानल्या गेलेल्या मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? त्याचसमवेत साक्षात् जिवंत म्हणून पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्रीगणेशमूर्तींना पर्यावरणवादी अन् इतर कचर्याच्या गाडीतून नेऊन टाकतात, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. श्रीगणेशमूर्तीच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे नगण्य असून केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांचा आनंद हिरावून घेण्यासाठी चालणारे श्रीगणेशमूर्तीदानासारखे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक श्री. रणजित आयरेकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते.
या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली अन्य सूत्रे . . .
१. एकीकडे पुरोगामी हे देवाचे अस्तित्वच मान्य करत नाहीत आणि दुसरीकडे ज्याचे अस्तित्वच मान्य नाही, त्याचे दानही मागतात, हा दुतोंडीपणा नव्हे काय ?
२. गणेशोत्सवामुळे होणारे प्रदूषण एक प्रतिशतही नसतांना लोकांच्या मनात प्रदूषणाच्या नावाखाली भीती पसरवून त्यांचा उत्सव साजरा करून घेण्यातील आनंद हिरावून घेण्यात येत आहे.
३. केवळ मुंबईतील देवनार पशूवधगृहात बकरी ईदला कत्तलीतून ३० लक्ष लिटर प्रदूषित पाणी निर्माण होते, तर महाराष्ट्रात किती प्रदूषित पाणी निर्माण होत असेल ? असे असतांना त्यावर कोणी काहीच न बोलता केवळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणार्या प्रदूषणावर बोलतात, हे अत्यंत चुकीचे आहे. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या संदर्भात निकाल दिला आहे. या निकालाची कार्यवाही कोण करणार ? पोलीस प्रशासनाने आतापर्यंत किती अवैध भोंगे असणार्या मशिदींना नोटिसा दिल्या ?
४. मुळात हिंदूचे सण हे पर्यावरणपूक आहेत. आम्ही निसर्गाला देव मानतो त्यामुळेच आम्ही सागराची पूजा करतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न होण्यासाठी हिंदु धर्मीय उलट अधिक जागरूक आहेत.
या वेळी बोलतांना अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले…
१. अलीबाग नगरपरिषदेने गतवर्षी हिंदु जनजागृती समितीच्या आवाहनाची सत्यता लक्षात घेऊन कृत्रिम हौद बांधण्याचा निर्णय रहित करून श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. जर अलीबाग नगरपरिषद करू शकते, तर कोल्हापूर महापालिका नैसर्गिक स्त्रोतांमध्येच विसर्जन करण्याचा निर्णय का घेऊ शकत नाही ?
२. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न केल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक वेळा नोटिसा बजावल्या आहेत, त्यानंतर एकदा १ लाख आणि दुसर्यांदा २ लाख रुपयांची महानगरपालिकेची बँक हमी जप्त केली आहे, तर त्याही पुढे जाऊन कोल्हापूर महापालिका कार्यालयाचा वीजपुरवठा दोन वेळा खंडित करण्यात आलेला आहे. तसेच पंचगंगा नदीच्या जलप्रदूषणास उत्तरदायी असणारे तत्कालीन कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, जलअभियंता यांच्या विरोधात ३ फौजदारी खटले प्रविष्ट करण्यात आलेले आहेत. या गोष्टींकडे दुर्लक्ष का केले जाते ?
३. गतवर्षी पुणे महापालिकेने दान घेतलेल्या मूर्ती परत नदीत नेऊन टाकल्या होत्या. असे होणार असेल, तर श्रीगणेशमूर्ती दान घेण्यातच का येतात ?
४. सामान्य हिंदु सहिष्णु असल्यानेच हे प्रकार होत आहेत; त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर टाच आणणारे मूर्तीदानासारखे प्रकार बंद होणे आवश्यक आहे.
अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी पर्यावरणवादी कुठे असतात ? – रमेश शिंदे
एका पत्रकाराने तुम्ही प्रदूषण होऊ नये म्हणून वर्षभर काय करता असा प्रश्न विचारल्यावर श्री. रमेश शिंदे म्हणाले, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आम्ही गेली अनेक वर्षे जलाशय प्रदूषित होऊ नये म्हणून पुणे येथील खडकवासला रक्षण मोहीम राबवत आहोत. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. समिती प्रदूषण न होण्यासाठी केवळ एक दिवस नाही, तर वर्षभर कार्यरत असते. त्याउलट हे कथित पर्यावरणवादी आणि पुरोगामी केवळ हिंदूंच्या सणांच्या उत्सवाच्या वेळीच कार्यरत होतात. अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी ते कुठे असतात ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात