सांगली : प्रदूषण मंडळाच्या सातत्याने आम्हाला नोटिसा येत आहेत आणि त्या संदर्भात आम्हालाही कृती करणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टरच्या श्री गणेशमूर्ती नागरिक खरेदी करतात. त्यासाठी लोकांच्या प्रबोधनासमवेत तुम्हीही काही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. यांसाठी प्रशासनाच्या स्तरावर माझ्यासह अधिकाधिक अधिकार्यांच्या घरी शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त श्री. रवींद्र खेबूडकर यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयुक्तांना श्री गणेशविसर्जनासाठी कृत्रिम हौद करण्यात येऊ नये, तसेच अन्य मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्मिता माईणकर, सौ. मधुरा तोफखाने आणि वाहतूक सेनेचे श्री. धर्मेंद्र (आबा) कोळी उपस्थित होते.
सौ. मधुरा तोफखाने म्हणाल्या की, महापालिका क्षेत्रात काही ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुंड ठेवले जातात. गतवर्षी या कुंडातील मूर्ती विसर्जन करतांना विटंबनेसारखे प्रकार झाले होते. त्यामुळे महापालिकेने अधिकाधिक नागरिकांना विसर्जनासाठीच आवाहन करावे. त्याचप्रकारे काही पर्यावरणावादी संघटना प्रदूषणाच्या नावाखाली निर्माल्य दान घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर करतात, त्यालाही प्रतिबंध करण्यात यावा. हेच निवेदन उपमहापौर श्री. विजय घाटगे यांनाही देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात