रामनाथी (गोवा) : सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने २१ जून २०१६ या दिवशीच्या अंकात पृष्ठ २ वर सनातन मे पॉज अ थ्रेट लाईक तालिबान, आयएस्आयएस् – दाभोलकर्स सन या मथळ्याखाली मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्या वतीने या दैनिकाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना ११.७.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी कायदेशीर नोटिसीतील संस्थेच्या मागणीची पूर्तता करण्यास नकार दिला. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते श्री. गजानन नाईक, श्री. नागेश ताकभाते, कु. दीपा तिवाडी आणि श्री. रामदास केसरकर यांच्या वतीने दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक जॉय पूरकायस्थ, मालक बेनेट कोलमन अॅण्ड कंपनी लि. आणि मुद्रक अन् प्रकाशक श्री. रणजित जगदाळे यांच्या विरोधात मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपये मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात प्रविष्ट केला आहे.
यापूर्वीही दैनिक टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने फॉर धिस कल्ट, क्रिटीक्स आर् डेमॉन्स या मथळ्याखाली त्यांच्या २० जून २०१६ या दिवशीच्या अंकात संस्थेच्या विरोधात मानहानीकारक लेख प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केल्यावरून संस्थेने दैनिक टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक, मालक आणि मुद्रक अन् प्रकाशक यांच्या विरोधात याच न्यायालयात दिवाणी दावा प्रविष्ट केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments