Menu Close

नंदुरबार : ७८ गणेशोत्सव मंडळांचा आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय !

हिंदु जनजागृतीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत संघटित झालेल्या ७८ गणेशोत्सव मंडळांचा निर्णय !

Ganesh-Shubhechha

१. नंदूबारमधील गणेशोत्सव आणि गणेशोत्सव मंडळांची पूर्वीची स्थिती !

अ. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ स्थापन होण्यापूर्वी हिंदूंना दिली जाणारी सापत्न वागणूक !

गणेशोत्सव आणि गणेशमूर्तींचे कारखाने यांसाठी महाराष्ट्रात नंदूरबार हे शहर प्रसिद्ध असून त्याला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. व्यायामशाळांच्या मंडळांचे ढोल-ताशांच्या तालावरचे नृत्य, मिरवणुकांमधून होणारे लाठ्या-काठ्या आणि तलवारींचे खेळ आणि मानाच्या दादा-बाबा गणपतींची हरिहर भेट हे नंदूबार येथील गणेशोत्सवातील आकर्षणबिंदू राहिले आहेत. उत्सवाच्या वेळी होणार्‍या शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये ४० टक्के हिंदू आणि ६० टक्के अन्य धर्मीय उपस्थित असत. (हिंदूंवर होणारा हा घोर अन्याय आहे. हिंदूंच्याच देशात हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी अन्य धर्मियांनी अशा प्रकारे दबाव निर्माण करणे आणि प्रशासनाने तो मान्य करणे, हा गेली ६७ वर्षे काँग्रेस शासनाने केलेल्या त्यांच्या लांगूलचालनाचाच परिणाम होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

आ. हिंदूंचा उत्सव असूनही हिंदूंवरच अन्य धर्मियांचा प्रशासनाच्या साहाय्याने दबाव !

आतापर्यंत होणार्‍या या बैठकांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून हिंदूंना सापत्न वागणूक दिली जाई, तसेच त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून अन्य धर्मियांच्या तक्रारींकडेच अधिक लक्ष दिले जायचे.

२. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना !

या स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना केली. नंदूरबार शहरातील ५० टक्क्यांहून अधिक मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी यात सहभाग दर्शवला.

३. हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने पहिल्या वर्षात केलेले कार्य

अ. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या प्रयत्नाने सर्वच उत्सवांच्या अनुमतींसाठी एक खिडकी योजना चालू होऊन सर्व अनुमती तेथे मिळणे !

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ स्थापन होताच प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणार्‍या अनुमतीचा प्रश्‍न हाती घेण्यात आला. यापूर्वी अनुमतीसाठी विविध मंडळांच्या प्रतिनिधींना एकट्याने जावे लागायचे. वेगवेगळ्या विभागांकडे विविध मंडळांच्या पदाधिकार्‍यांना अनुमतीसाठी खेटा घालाव्या लागायच्या. जिल्हा प्रशासनाने सर्व अनुमती एकाच ठिकाणी म्हणजे एक खिडकी योजनेद्वारे उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महामंडळाच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्याकडे २५ ऑगस्ट २०१५ या दिवशी निवेदनाद्वारे करण्यात आली. महामंडळांतर्गत संघटित झालेल्या गणेशोत्सव मंडळांची लगेच नोंद घेऊन केवळ गणेशोत्सवापुरतीच नव्हे, तर सर्वच उत्सवांसाठी जिल्ह्यात एक खिडकी योजनेद्वारे अनुमती देण्याचे आदेश काढले !

आ. भारनियमन टाळण्याची मागणी ऊर्जामंत्र्यांकडे केल्यावर अपवाद वगळता त्याची कार्यवाही झाली !

गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन केले जाते आणि आरास पहाणार्‍यांचा हिरमोड होतो. वीज खंडित होताच टवाळखोरांकडून महिलांची छेड काढण्याचेही प्रकार घडतात. ४ सप्टेंबर २०१५ या दिवशी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे नंदूरबारच्या दौर्‍यावर आले असता सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने त्यांना निवेदन सादर केले. गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करू नये, अशी मागणी निवेदनातून त्यांच्याकडे करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन होणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी दिले. अपवाद वगळता तशी कार्यवाही झाल्याचे पुढे पहायला मिळाले.

इ. हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे धर्मशास्त्रानुसारच गणेशोत्सव साजरा करण्यास गणेशोत्सव मंडळे प्रवृत्त झाली !

समितीने आदर्श गणेशोत्सव कसा असावा आणि कसा नसावा, याविषयीचे प्रबोधन करण्यासाठी चित्रफीत दाखवण्याचे आयोजन केले होते. तीन दिवसांत १२ सहस्रांहून अधिक गणेशभक्तांनी याचा लाभ घेतला. आम्हीही पुढील वर्षांपासून धर्मशास्त्रानुसारच गणेशोत्सव साजरा करू, असे मत अनेकांनी मांडले.

४. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे दुसर्‍या वर्षाचे म्हणजे यंदाचे सेवाकार्य !

अ. गणेशोत्सव मंडळांची स्वतंत्र बैठक घेण्याविषयी मागणीचा ठराव !

मागील वर्षीप्रमाणेच यंदाही नंदूरबार शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक २१ ऑगस्ट २०१६ या दिवशी घेण्यात आली. निमंत्रित केलेल्या ७८ मंडळांपैकी ३७ मंडळांचे ९५ पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेऊन प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरले. जिल्हा प्रशासनाच्या शांतता बैठकीत मंडळांच्या अडचणींवर योग्य चर्चा आणि निर्णय होत नसल्याने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे गणेशोत्सव मंडळांची स्वतंत्र बैठक घेण्याविषयी मागणी करावी, असा महत्त्वाचा ठराव या वेळी करण्यात आला. त्याप्रमाणे २३ ऑगस्ट २०१६ या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

आ. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी दिलेली आश्‍वासने !

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून मंडळांनी संघटितपणे मांडलेल्या सूत्रांची या प्रसंगी दोन्ही प्रमुख अधिकार्‍यांनी (जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक) जिल्हाधिकार्‍यांनी विशेष नोंद घेतली आणि मागणीनिहाय आश्‍वासन दिले.

जिल्हाधिकारी म्हणाले की,

१. गणेशोत्सव मंडळांना लागणार्‍या विविध विभागांशी संबंधित अनुमती एक खिडकी योजनेतून उपलब्ध करून देण्याची प्रभावी अंमलबजावणी करू.

२. प्रकाशा येथे थेट पात्रात जाण्याची सोय नाही; म्हणून अनेक मंडळे किंवा व्यक्ती पुलावरूनच मूर्ती फेकून विसर्जित करतात. हा प्रकार देवाची विटंबना करणारा आहे. ही विटंबना थांबवण्यासाठी पुलावर विसर्जनाच्या दिवशी क्रेन उपलब्ध करून देऊ किंवा पात्रात उतरण्यासाठी रस्ता करून देऊ.

३. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथकात उपनिरीक्षक दर्जाचे ४ अधिकारी नियुक्त करू.

४. संबंधित विभागप्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची एकत्रित बैठक घेण्याचेही त्यांनी मान्य केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक या वेळी म्हणाले की,

१. प्रत्येक मंडळाच्या दोन स्वयंसेवकांना गणवेश देण्यात येईल.

२. वाहतुकीचे नियोजन करून आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेट्स लावले जातील. बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात येईल.

३. अधीक्षक अभियंतांनी सांगितले, गणेशोत्सवकाळात भारनियमन होणार नाही. तांत्रिक कारणांचा मात्र अपवाद राहील. प्रत्येक विभागात दोन कर्मचारी विद्युत जनित्रापाशी नियुक्त केले जातील.

इ. मूर्तीदान आणि कृत्रिम तलाव या उपक्रमांना पाठिंबा देणार नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन !

मूर्तीदान घेणे आणि कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करणे, हे प्रशासनाच्या विचाराधीन नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी या वेळी स्पष्ट केले.

जिल्हा प्रशासनाकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक आणि पाठिंबा !

५. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांच्या जिल्हा प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत !

अ. नंदूरबारच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव मंडळांची स्वतंत्र बैठक घेण्यास प्रशासनाला महामंडळाने पाडले भाग !

गणेशोत्सव शांततेत पार पडावा म्हणून प्रतीवर्षी इतर धर्मियांसमवेत शांतता समितीची बैठक घेतली जाते. त्याऐवजी केवळ गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन चर्चा करावी, ही मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने लावून धरल्यावर जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी गांभीर्याने लक्ष घातले. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांना संपर्क करून ३० ऑगस्ट या दिवशी त्यांनी बैठकीचे आयोजन केले आणि नंदूरबारच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव मंडळांची प्रशासनासमवेत स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकली. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मागणीला मान देत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक, शहर आणि उपनगरचे निरीक्षक, तहसीलदार, वीजमंडळाचे अधीक्षक अभियंता, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर्टीओ) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)चे प्रमुख अधिकारी, तसेच अन्य उपस्थित होते. मंडळांचे पदाधिकारीही उपस्थित होते. बैठकीस प्रारंभ झाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बैठकीचे सूत्र हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांच्या हातात आदर्श गणेशोत्सवाविषयी प्रबोधन करणारी १७ मिनिटांची ध्वनीचित्रफीत उपस्थितांनी पाहिली.

आ. महामंडळाने या प्रसंगी पुढील काही प्रमुख सूत्रे मांडली.

१. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आला असतो, तेव्हाच प्रशासन शांतता समितीची बैठक घेऊन अडचणी आणि समस्यांवर चर्चा करते. परिणामी या कालावधीत समस्या जाणून घेऊन ती सोडवण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून पुढील वर्षापासून गणेशोत्सव मंडळांची स्वतंत्र बैठक १ मास अगोदर घेतली, तर समस्यांवर उपाययोजना करायला अधिकार्‍यांना अवधी मिळू शकतो.

२. अवाढव्य आणि विडंबनात्मक मूर्ती बनवणे मूर्तीकारांनी थांबवावे, यासाठी प्रशासनाने पुढील वर्षी मूर्तीकारांची सहा मास आधी बैठक घेऊन सूचना करावी. हिंदु जनजागृती समिती प्रबोधन करण्यासाठी त्या बैठकीत येईल, असे या प्रसंगी महामंडळाकडून सांगण्यात आले.

३. त्यानंतर अनुमतीच्या प्रक्रियेत संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या ऑनलाईन अजर्र् भरण्याची अट जाचक असून ती रहित केली जावी.

४. कचर्‍याच्या गाडीतून मूर्ती वाहून नेणे, निर्माल्य पालिकेच्या कचर्‍याच्या गाडीतून वाहून नेणे, हेही धर्मशास्त्राच्या विरोधात असून धर्मभावना दुखावणारे आहे. तरी या सर्व प्रकारांना पायबंद घातला जावा,

५. विसर्जन मार्गावरील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी,

६. तसेच ऐन विसर्जनाच्या दिवशी किंवा गणेशोत्सवाच्या काळात पथदिवे बंद असणे किंवा वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवले जावे, पालिकेला पथदिवे दुरुस्त करण्याचे आदेश दिले जावेत या मागण्यांचे सूत्र श्री बाबा गणपति मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील सोनार, मारुति व्यायामशाळेचे अर्जुन मराठे, मेहेतर समाजाचे अध्यक्ष, क्षत्रिय युवक मंडळाचे कैलास भावसार आणि पदाधिकार्‍यांनी मांडले.
मोकाट गुरे आणि अवैध पशूवधगृहे या विषयांच्या अनुषंगानेही नगरपालिका मुख्याधिकार्‍यांशी सर्वांसमक्ष सडेतोड चर्चा झाली.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक

बैठकीच्या समारोपाप्रसंगी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केलेली भावना अत्यंत महत्त्वाची होती. ते म्हणाले, हिंदु जनजागृती समितीने ध्वनीचित्रफीतीद्वारे दाखवलेला गणेशोत्सवच खरोखर आदर्श असून सर्व मंडळांनी त्यापद्धतीनेच उत्सव साजरा करावा. समितीने सांगितल्याप्रमाणे विदेशी बनावटीच्या वस्तू न वापरता स्वदेशी वस्तूंनाच प्राधान्य द्यावे.

६. गणेशोत्सव महामंडळाने पत्रकार परिषदेत दिलेली कार्याची माहिती !

अ. मूर्तीकाराचे प्रबोधन करून थांबवले श्री गणेशाचे विडंबन !

शहरातील एका मूर्तीकाराने रुग्णाईत उंदराला डॉक्टरच्या रूपातील गणपति तपासत आहे, अशी मूर्ती सिद्ध केली होती. याविषयी कळताच हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, प्रा. सतीश बागूल, भावना कदम, आकाश गावित यांनी मूर्तीकाराची भेट घेतली. त्याने ५० पैकी ४३ मूर्तींची विक्री झाल्याचे सांगितले. विडंबनात्मक मूर्ती बनवून धर्महानी होत असल्याविषयी त्याचे प्रबोधन केल्यावर उर्वरित मूर्ती विकणार नाही आणि यापुढे अशा मूर्ती बनवणार नाही, असे मूर्तीकाराने सांगितले.

आ. श्री गणेशाच्या १९३ लघुग्रंथांचे वितरण !

११ मूर्तीकारांना भेटून अथर्वशीर्ष आणि श्री गणेश पूजाविधी या लघुग्रंथांची माहिती देण्यात आली. त्यांचे वितरण करण्याचेही सूचीत करण्यात आले. या माध्यमातून मूर्तीकार आणि धर्माभिमानी यांनी मिळून १९३ ग्रंथांचे वितरण केले.

७. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे रूपांतर (सर्वच) सार्वजनिक उत्सव महामंडळात करण्याचा निर्णय !

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महामंडळाच्या माध्यमातून संघटित होऊन केलेल्या प्रयत्नांना श्री गणेशाच्या कृपेने आलेले यश पाहून महामंडळाला जोडलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा उत्साह पुष्कळ वाढला आहे. आता यापुढे इतर उत्सवांसाठीही महामंडळाच्या माध्यमातून कार्य करावे, अशी कल्पना पुढे आली. या कल्पनेला लगेचच स्वीकारून सर्व पदाधिकार्‍यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे नामांतर सार्वजनिक उत्सव महामंडळ असे करण्याचा निर्णय एकमताने केला. या माध्यमातून नवरात्रोत्सव, कानुमाता उत्सव, होलिकोत्सव आदी प्रसंगी कार्यरत करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मागण्यांना स्थानिक वृत्तपत्रांनी दिली ठळक प्रसिद्धी !

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मागण्यांचे हे निवेदन नंदूरबार येथील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांना दिल्यावर त्याला भरभरून प्रसिद्धी मिळाली. दैनिक सकाळ, दिव्य मराठी, देशदूत, पुण्यनगरी, खान्देश गौरव, तापीकाठ, लोकमत, गांवकरी, देशोन्नती, पुढारी, नंददर्शन, उत्तर महाराष्ट्र या वृत्तपत्रांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. – डॉ. नरेंद्र परशराम पाटील, नंदुरबार

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *