मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गुन्हेगारांना खाकी वर्दीचे भय उरले नसल्याचे द्योतक आहे.
१. ठाणे येथे बंदोबस्त करण्यासाठी असलेल्या वाहतूक पोलिसांवर आक्रमण
ठाणे : मुंबईतील वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांचा जीवघेण्या आक्रमणात मृत्यू झाल्याची दुर्घटना ताजी असतांनाच वाहतूक पोलिसाला धडक देऊन त्याला तब्बल अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच ठाणे येथे घडला. वाहतूक पोलीस नरसिंह महापुरे यांनी गाडीच्या बोनेटला घट्ट पकडून ठेवल्याने ते वाचले. या प्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला अटक केली आहे.
गाडी वेडीवाकडी फिरवत महापुरे यांना पाडण्याचा प्रयत्नही चालकाने केला. महापुरे यांचे सहकारी मनीषसिंह यांच्या उजव्या पायावरूनही चालकाने गाडी घातली. त्यानंतर नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी हा प्रकार थांबवत मद्यधुंद अवस्थेतील योगेश भामरे याला गाडीतून बाहेर काढून त्याला पोलिसांच्या कह्यात दिले.
२. पुण्यात पोलिसांवर गोळीबार आणि अन्य ठिकाणी मारहाण
२ अ. पाषाण टेकडीवर चोरट्यांकडून दोन पोलिसांवर गोळीबार
३ सप्टेंबरच्या रात्री पुण्यातील पाषाण टेकडीवर गस्तीसाठी गेलेल्या २ पोलिसांवर चोरट्यांनी एअर गनमधून गोळीबार केला. यामध्ये एका पोलिसाच्या छातीच्या बरगडीजवळ बंदुकीचा छर्रा लागल्याने तो घायाळ झाला आहे. चोरट्यांनी दुसर्या पोलिसाच्या डोक्यात बंदुकीने मारहाण केली आहे.
२ आ. पुण्यात धर्मांधांकडून पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की
२ आ १. गुरुवार पेठेत धर्मांध ट्रकचालकाकडून महिला पोलिसाला मारहाण आणि धक्काबुक्की : पुण्यातील गुरुवार पेठ येथे जड वाहनांस मनाई असलेल्या रस्त्यावरून वसीम युसूफ पटेल हा ट्रक घेऊन चालला होता. त्याला महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री मोहिते आणि पोलीस कर्मचारी माळी यांनी रोखले. त्यावर पटेलने मोहिते आणि माळी यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
२ आ २. कोंढवा भागातही मोटारचालकाकडून पोलिसांना मारहाण : कोंढवा भागात पोलीस कर्मचारी नितेश टपके यांनी भरधाव वेगात निघालेला मोटारचालक अल मुसावीर अजीज महंमद शेख याला थांबवले. त्या वेळी शेख याने टपके यांना धक्काबुक्की केली आणि टपके यांच्या बोटांचा चावाही घेतला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी गुन्हे प्रविष्ट केले असून पोलिसांनी अल मुसावीर अजीज महंमद शेख याला अटक केली आहे. (सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्यामुळेच ते उद्दाम झाले आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. नाशिकमध्येही पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार
३ अ. तपोवन भागात पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न : नाशिक येथील तपोवन भागात उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीद्वारे वाहन पडताळणी करत होते. त्या वेळी रिक्शाचालक सागर शिवाजी नाईक याने पोलिसांच्या दिशेने रिक्शा भरधाव आणून त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून सागर नाईक याला अटक केली आहे.
३ आ. काठे गल्लीत वाहनचालकांकडून पोलिसांना धक्काबुक्की : काठे गल्लीत कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब चत्तर यांनी मुख्य रस्त्यावरून चुकीच्या दिशेने प्रवास करणारे दुचाकीस्वार आनंद तसाबंड आणि त्याच्या दोन साथीदारांना रोखले असता त्यांनी चत्तर यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. पोलिसांनी या प्रकरणी संशयितांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला आहे.
४. कल्याण, ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न
कल्याण : येथील तिसगाव नाका परिसरात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी जरीमरी गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याने पोलीस उपनिरीक्षक नितीन डमरे यांना पाण्यात बुडवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. डमरे हे तिसगाव नाका येथे बंदोबस्तासाठी असतांना त्यांचा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी वादविवाद झाला. त्यातून पुढे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे.
५. शिर्डी (जिल्हा नगर) येथे एका वाहनचालकाने पोलिसाच्या कानशिलात लगावली
शिर्डी येथील शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्याने कागदपत्राची मागणी केल्याचा राग आल्याने शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारातच विजय पोपट उदावंत याने त्या पोलिसाच्या कानशिलात लगावली. याविषयी शिर्डी पोलीस ठाण्यात उदावंत यांच्या विरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात