कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने श्रीगणेशमूर्तीदान हा विषय पूर्णपणे ऐच्छिक असेल. त्यासाठी कोणावरही बळजोरी करण्यात येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन कोल्हापूर मनपा उपायुक्त श्री. विजय खोराटे यांनी दिले. हिंदु संघटनांच्या वतीने ७ सप्टेंबर या दिवशी मूर्तीदान नको, तर मूर्तीविसर्जनच करा, या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. त्या वेळी हे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, कुंभार समाजाचे श्री. बाळासाहेब निगवेकर, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृतीचे सर्वश्री मधुकर नाझरे, किरण दुसे, सुधाकर सुतार यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केलेली मते…
१. शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे म्हणाले, श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी असेल. मूर्तीदान मोहीम महापालिका चालवत आहे, तर व्यापारीदृष्ट्या जाहिराती घेऊन मूर्तीदान घेणार्या संघटना व्यापार करत आहेत का ?
२. श्री. मधुकर नाझरे म्हणाले, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न केल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक वेळा नोटीसा बजावल्या आहेत, एकदा १ लाख आणि दुसर्यांदा २ लाख रुपयांची महानगरपालिकेची बँक हमी जप्त केली आहे, तर त्या पुढे जाऊन कोल्हापूर महापालिका कार्यालयाचा वीजपुरवठा दोन वेळा खंडित करण्यात आलेला आहे. तसेच पंचगंगा नदीच्या जलप्रदूषणास उत्तरदायी असणारे तत्कालीन कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, जलअभियंता यांच्या विरोधात ३ फौजदारी खटले दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेने आपली यंत्रणा धर्मविरोधी मूर्तीदान मोहिमेसाठी देऊ नये.
३. या वेळी श्री. किरण दुसे म्हणाले, अस्वच्छ आणि कचर्याच्या गाडीतून श्रीगणेशमूर्तीची वाहतूक केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जातात, तरी शासनाने याविषयी योग्य ती काळजी घ्यावी.
या वेळी कुंभार समाजाचे श्री. बाळासाहेब निगवेकर हे प्लास्टरची श्रीगणेशमूर्ती सोबत घेऊन आले होते. ही मूर्ती त्यांनी साध्या पाण्यात अमोनियम बायकार्बोनेटचा वापर न करताही चांगल्याप्रकारे विरघळते हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. हे प्रात्यक्षिक बघून उपायुक्तांनी, आम्ही या संदर्भात महापालिकेला कालच सूचना दिल्या असून मूर्तीविसर्जनाविषयी भाविकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात