हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखे’चे ‘धार्मिक उत्सव स्त्री-सुरक्षा अभियान’ !
मुंबई : लोकमान्य टिळकांनी उदात्त अशा राष्ट्रजागृती आणि संघटन या हेतूने चालू केलेल्या गणेशोत्सवाला राज्यभर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. हा उत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत असतांना मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचे चित्र दिसत आहे. या उत्सवातील विविध अपप्रकारांच्या समवेत गर्दीचा लाभ उठवत महिलांची होणारी छेडछाड, ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येच्या निवारणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने ‘धार्मिक उत्सव स्त्री-सुरक्षा अभियान’ राबवण्यास प्रारंभ केला आहे. त्या निमित्ताने विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन करण्यात येत आहे. अनेक मंडळांचा याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, आम्ही सर्व सार्वजनिक मंडळांना आवाहन करत आहोत की, त्यांनी महिला भाविकांच्या रक्षणासाठी ज्या मंडळांना शक्य आहे त्यांनी त्यांच्या मंडपाच्या परिसरात ‘सीसीटीव्ही’ लावावेत. महिला भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनरांगेची व्यवस्था करावी. महिला स्वयंसेवक नेमावेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या रांगांसाठी महिला पोलिसांचे साहाय्य घ्यावे. मिरवणुकीच्या कालावधीत स्त्री-कार्यकर्त्यांचे सुरक्षापथक सिद्ध करावे. महिलेची छेड काढणार्याला पोलिसांच्या कह्यात द्यावे. विविध ठिकाणी होर्डिंग, फलक आदींच्या माध्यमातून नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यातून ज्या महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी शक्य त्या ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचीही सोय करण्यात येणार आहे. तरी आम्ही सर्व मंडळांना आवाहन करत आहोत की, आपण या अभियानात सहभागी होऊन श्रीगणेशाची कृपा संपादन करावी.
‘आत्मबलसंपन्न नारीशक्तीसाठी महिलांचे संघटन’, हे ब्रीद असलेल्या रणरागिणी शाखेच्या वतीने भारताची भावी पिढी घडवण्यासाठीच्या या राष्ट्रकार्यात सर्वत्रच्या महिलांनी सहभागी व्हावे. ज्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अशा प्रकारचे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आपल्या परिसरात चालू करायचे असतील त्यांनी ८४५१००६११९ या क्रमांकावर संपर्क साधावा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात