- ढाकेश्वरीदेवीच्या मंदिराला कडक सुरक्षा !
- हिंदु पुजार्यांनी पारंपरिक वेश धारण करणे सोडले !
- महिला हातात बांगड्या घालण्यास घाबरत आहेत !
हिंदूंवरील अत्याचारांच्या वेळी मानवाधिकारवाले कुठे असतात ?
बहुसंख्यांक हिंदूंच्या भारतातील राजकारणी बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी स्वत:हून काही करतील, याची शाश्वती नाही ! त्यामुळे आता हिंदूंनीच त्यांच्या बांधवांच्या संरक्षणासाठी संघटित होऊन आवाज उठवायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेश अस्तित्वात येण्यापूर्वी वर्ष १९४७ मध्ये या ठिकाणी २७ टक्के अल्पसंख्यांक होते; मात्र आता त्याच्यात घट होऊन ते ९ टक्क्यांवर आले आहे. हिंदु पुजारी आणि बौद्ध गुरु यांना शोधून काढून ठार मारण्यात येत आहेत. त्यामुळे हिंदूंमधील भीती दिवसेंदिवस वाढत आहे. आम्हाला बाहेर पडणेही कठीण झाले आहे, अशी भीती बांगलादेशातील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरातील पुजारी विजय कृष्ण गोस्वामी यांनी व्यक्त केली आहे.
१. चालू वर्षांतच चार हिंदूंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यातील दोघे जण मंदिरांशी संबंधित आहेत. त्यामुळे घाबरलेले पुजारी त्यांचा वेष पालटून रहात आहेत. त्यांनी धोतर घालणे सोडून पॅन्ट-शर्ट घालणे चालू केले आहे. हिंदु महिलाही हातात बांगड्या घालण्यास घाबरत आहेत; कारण त्यांना मरणाची भीती सतावत आहे.
२. बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदाय परिषदेचे महासचिव आणि मानवाधिकार कार्यकर्ते राणा दासगुप्ता यांच्या मते वाढत्या हिंसेच्या विरोधात सरकार पावले उचलत आहे; मात्र त्यांच्याकडून अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
३. सरकारी आकडेवारीनुसार बांगलादेशात २२ सहस्र मंदिरे, किमान १० गुरुद्वारा, बर्याच प्रमाणात चर्च आणि इतर अल्पसंख्यांकांची श्रद्धास्थाने आहेत. येथील राष्ट्रीय मंदिर असलेल्या ढाकेश्वरी देवीच्या मंदिराला कडक सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
४. येथील शिखांचे सर्वांत मोठे श्रद्धास्थान असलेले गुरुद्वारा नानक शाही सध्या सैन्य तुकड्यांच्या निवासामध्ये रूपांतरित झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तेथे दर्शन घेणार्यांची संख्याही तुरळकच असते. या ठिकाणी मेटल डिटेक्टर लागलेले आहेत, तसेच मुख्य इमारतीच्या फाटकांना बहुतांश वेळा कुलुपे लागलेली असतात. गुरुद्वाराचे ग्रंथी वजीर सिंह यांनी त्यांच्या कुटुंबाला भारतातील पंजाबमध्ये परत पाठवून दिले आहे.
५. बांगलादेशात अनेक धर्मांध संघटना आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या हिंसेच्या घटनांचे दायित्व घेतले आहे. असे असतांना देशातील अस्थिर परिस्थितीला अवामी लीगच्या सरकारने इसिस किंवा अल्-कायदा यांच्याशी संबंधित संघटनांना दोषी न ठरवता सातत्याने विरोधी पक्ष किंवा स्थानिक मुसलमान संघटना यांना उत्तरदायी ठरवले आहे.
६. बांगलादेशाचे सूचनामंत्री हसनुल हक इनु यांच्या मते देशात कोणताही सामाजिक तणाव नाही. सरकारने अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे; मात्र केवळ सरकारवर दबाव निर्माण व्हावा आणि मानहानी व्हावी, यासाठी कट्टरतावाद्यांकडून अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात