-
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कारणावरून एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत पोलिसांकडून धक्काबुक्की !
-
दोघांवर गुन्हा प्रविष्ट करण्याची धमकी !
या संदर्भात गृहखाते काय करणार आहे ? पारंपरिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी सातारा येथे प्रशासनाकडून स्वयंघोषित बंदी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सातारा : पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येथील खाजगी मंगळवार तळ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे कारण पुढे करत भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केला. (पोलीस हिंदूंना धार्मिक परंपरांचे पालन करण्यास प्रदूषणाचे कारण पुढे करत अटकाव करतात, तसे ते अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टी प्रदूषणाला बाधक असूनही त्यांना अटकाव करत नाहीत, ही वस्तूस्थिती जाणायला हवी. हिंदूंनी शास्त्रीय परंपरांचे पालन करायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलिसांनी मंगळवार तळ्याच्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करू दिले नाही. या वेळी तेथे मूर्तीविसर्जनास गेलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलिसांना समजावून आणि विविध प्रकारची कायदेशीर कागदपत्रे दाखवली, तरीही उलट त्यांनाच दमदाटी करून पोलिसांनी कह्यात घेतले. (रझाकारी पोलीस ! पुरोगाम्यांच्या दबावामुळे पोलीस हिंदुत्वनिष्ठांचा असा छळ करत असतील, तेथे सामान्यांची काय स्थिती असेल, याची कल्पना करू शकतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी एका भाविकाची पोलिसांसमवेत वादावादी झाली. कोणताही विचार न करता पोलिसांनी अक्षरशः त्यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना धक्काबुक्की केली.
१. मागील वर्षी येथील स्थानिक प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाचा गैरवापर करत सातारा शहरातील नैसर्गिक जलस्रोत असणार्या तळ्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विसर्जनास सक्त मनाई, असे अवैध आणि धादांत खोट्या आशयाचे फलक लावले होते. त्यामुळे त्या वेळी समस्त गणेशभक्तांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती.
२. मागील वर्षी, तसेच यावर्षी हिंदु जनजागृती समितीने सर्व गोष्टींचा अभ्यास करून लावलेल्या फलकावरील ओळीप्रमाणे न्यायालयाचे निर्देश नसल्याविषयी आणि प्रशासनाच्या या खोटेपणाविषयी (स्वयंघोषित बंदीविषयी) जनजागृती केली होती. त्यामुळे यावर्षी हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही नागरिक जागृत होऊन, त्यांनी शहरातील नैसर्गिक जलस्रोत असणार्या तळ्यांमध्येच श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता, तसेच मंगळवार तळ्यावर संबंधित विसर्जनास मनाईचा फलकही यावर्षी लावण्यात आला नव्हता.
३. १० सप्टेंबर या दिवशी मंगळवार तळ्यावर हिंदुत्वनिष्ठ मूर्तीविसर्जनामागील शास्त्र त्यांना सांगून प्रबोधन करत असल्याने भाविक कृत्रिम हौदाऐवजी मंगळवार तळ्यामध्ये मूर्तीविसर्जन करण्यासाठी येत होते; मात्र त्या वेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत बेंद्रे यांनी श्री गणेशमूर्ती तळ्यामध्ये विसर्जन करण्यास अटकाव केला.
४. या वेळी घटनास्थळी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुटुंबियांसमवेत आलेले सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत बेंद्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाप्रशासनाला मूर्तीविसर्जनाविषयी दिलेले आदेश, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दिशानिर्देश, पुणे येथील सृष्टी इको रिसर्च सेंटरचा पर्यावरणीय अभ्यासाचा दाखला आदी कागदपत्रे दाखवली; मात्र तरीही त्यांचे काहीही ऐकून न घेता पोलिसांंनी श्री. कोल्हापुरे यांनाच दमदाटी करण्यास प्रारंभ केला. श्री. कोल्हापुरे यांनी हे खाजगी तळे असल्याने त्याचे मालक आणि भाविक यांच्यामधील हा प्रश्न आहे. येथे प्रशासनाचा संबंध नाही, असेही सांगितले; मात्र तरीही पोलीस ऐकत नव्हते. (तळ्यात मूर्तीविसर्जन करू नये, असा कुणाचाही आदेश नसतांना पोलीस कुणाच्या दबावाखाली हिंदु धर्माविरुद्ध वागत होते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. या वेळी पोलिसांच्या दबावाला बळी न पडता श्री. कोल्हापुरे यांसह अन्य भाविकांनी श्री गणेशमूर्ती रस्त्यावर ठेवून प्रशासनाने टाकलेल्या या स्वयंघोषित बंदीचा निषेध केला. तसेच धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नका अशी विनंती केली; मात्र पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी अरेरावीची भाषा वापरत श्री. कोल्हापुरे आणि भाविक यांना दटावण्यास प्रारंभ केला. (हिंदुत्वनिष्ठ भाजपच्या राज्यातही हिंदूंना त्यांच्या परंपरांचे पालन करण्यावर पोलीस बंधने आणतात. हिंदूंना कुणीच वाली नाही, असे समजायचे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. या वेळी पोलिसांनी भाविकांना पारंपरिक पद्धतीने मंगळवार तळ्यात विसर्जन करू न दिल्याने आणि कृत्रिम हौदात विसर्जनासाठी री केल्याने भाविकांनी अखेर कृत्रिम तलावात मूर्तीविसर्जन केले.
७. या वेळी एका भाविकाला धक्काबुक्की केल्यावर पोलिसांनी त्यांना आणि सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांना कह्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेऊन बसवून ठेवले. ही वार्ता शहरात वार्यासारखी पसरली आणि बघता-बघता शहरातील हिंदुत्वनिष्ठ शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा झाले.
८. या वेळी पोलिसांनी मंगळवार तळ्यामध्ये मूर्तीविसर्जन करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत हिंदुत्वनिष्ठांवरच अरेरावी केली, तसेच त्यांनी गणेशभक्त आणि श्री. कोल्हापुरे यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्याची धमकीही दिली.
सनातन प्रभातचे वार्ताहर असल्याने श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई करण्याचा पोलिसांचा प्रयत्न !
घटनास्थळी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुटुंबियांसमवेत आलेले सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांना कोणत्याही कारणाविना पोलिसांनी कह्यात घेतले. पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे म्हणाले, मीही सनातन संस्थेचा साधक आहे; पण आम्ही आमचा धार्मिकपणा जगाला दाखवत फिरत नाही. आमच्या मनात काय ते ठेवतो. (धादांत खोटे वक्तव्य करणारे पोलीस उपनिरीक्षक बेंद्रे ! चंद्रकांत बेंद्रे कधीपासून सनातन संस्थेचे साधक झाले ? ते साधक असते, तर त्यांनी पुढाकार घेऊन कृत्रिम हौद बंद करून तळ्यात मूर्तीविसर्जन करण्यास भाविकांना सांगितले असते. येथेतर नेमके उलट झाले आहे. त्यामुळे बेंद्रे त्यांच्या धार्मिकपणाविषयी जे सांगत आहेत, त्यावर कोण विश्वास ठेवणार ? सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांना मूर्तीविसर्जनाच्या वेळीच कह्यात घेतल्याविषयी संबंधितांवर कारवाईसाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) केवळ सनातनच्या आकसापोटीच शाहूपुरी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांना कह्यात घेतल्याचे दिसून आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात