नाशिक : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात विविध गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालये यांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात येत आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे अवडंबर रोखून आदर्शरित्या साजरा करण्यासाठी विविध मंडळांना भेटून प्रबोधन करण्यात येत आहे. आदर्श गणेशोत्सवाच्या चळवळीला पाठिंबा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथील मनसेचे नगरसेवक अधिवक्ता राहूल ढिकले यांची भेट घेण्यात आली. समितीने गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी उभारलेल्या चळवळीविषयी त्यांना माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. या वेळी त्यांनी समितीच्या उपक्रमाचे आणि चळवळीचे कौतुक करून पाठिंबाही दिला. हिंदूंमध्ये जनजागृती करणे आणि त्यांचे कल्याण साधणार्या चळवळी, उपक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी त्यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. अनिल पाटील, श्री. रविंद्र सोनईकर, श्री. शैलेश पोटे हे उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. बोर्डे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्तींचे दान घेणे, कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करणे आदींसारख्या गोष्टी मनपाच्या वतीने राबवल्या जातात. यासाठी काही ठिकाणी बळजोरी केली जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे वहात्या पाण्यातच व्हायला हवे. अशा विसर्जनाने प्रदूषण होत नसल्याचा शासकीय अहवाल आहे, असेही या वेळी त्यांना सांगण्यात आले. या संदर्भातील एक निवेदन समितीचे कार्यकर्ते श्री. शशिधर जोशी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रफुल्ल पाठक यांनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात