सांगली : भाविकांनी श्रीगणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सांगली, उदगाव आणि कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी नदीच्या काठावर हातात विसर्जनाचे शास्त्र सांगणारे फलक धरले होते. उदगाव येथे सर्वश्री संजय घाटगे, अण्णासाहेब घाटगे, अशोक केंगार, प्रदीप कुलकर्णी आणि विनायक शिंगाडे उपस्थित होते. उदगाव ग्रामपंचायत आणि ग्रीन युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीदान मोहीम राबवण्यात आली. यात नदीपासून काही अंतरावर खड्डा खणून दान घेतलेल्या मूर्ती त्यात विसर्जित करण्यात येत होत्या; मात्र ९५ प्रतिशत भाविकांचा मूर्तीदानाऐवजी मूर्ती विसर्जनाकडेच कल होता. या वेळी अनेक भाविकांनी तुम्ही चांगला उपक्रम राबवला. फलकांमुळे माहिती मिळाली, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सांगली येथे भाविकांचा मूतीविसर्जनास सकारात्मक प्रतिसाद !
सांगली येथे भाविकांनी उत्स्फूर्तपणे श्रीगणेश विसर्जनालाच प्राधान्य दिले. या वेळी श्रीगणेशमूर्तीसमवेत निर्माल्य पाण्यात विसर्जन करण्यासाठीही भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी निर्माल्य पाण्यात विसर्जन करण्यावरून महापालिकेच्या कर्मचार्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत काही काळ वाद घातला; मात्र त्या वेळी तेथे एक हिंदुत्ववादी उपस्थित होते, त्यांनी समितीची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. या वेळी एका अन्य धर्मिय व्यक्तीनेही समिती करत असलेल्या प्रबोधनाचे कौतुक केले.
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रबोधनामुळे भाविकांनी निर्माल्य नगरपालिकेच्या गाड्यांमध्ये न टाकता ते नदीत विसर्जन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात