फलटण (जिल्हा सातारा) : आम्ही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याविषयी कोणावरही बळजोरी करणार नाही. गणेशमूर्ती शाडूच्या बनवण्याविषयीचे प्रबोधन आम्ही करत आहोत, तुम्हीही करा. श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पिण्याच्या पाण्यात करू नये आणि ते कृत्रिम हौदात करा, असे शासनाचे आदेश असल्याने आम्हाला कृत्रिम हौद सिद्ध करावे लागत आहेत. श्री गणेशमूर्तीदानाचे प्रकार येथे होत नाहीत. गणेशमूर्ती शाडूमातीच्याच बनविण्याविषयी शासनाने कायदा करायला हवा, असे मत फलटणचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी व्यक्त केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात करावे, तसेच मूर्तीदान मोहीम राबवू नये, याविषयीचे निवेदन जाधव यांना ८ सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. त्या वेळी शिष्टमंडळाशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. श्री. जाधव पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी यावर कृत्रिम हौद तयार केले आहेत, तेथे आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहोत. कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती विरघळल्या नसतील, तर त्या मूर्तीचे विसर्जन कालव्यात किंवा विहिरीमध्ये करणार आहोत. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, आशिष कापसे, मंगेश खंदारे, अमोल सस्ते आणि सौ. मनीषा बोबडे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात