सनातनच्या पनवेल आश्रमात असणार्या काही साधकांना मानसिक त्रासासाठी एच् आणि एच् १ ही औषधे देण्यात येतात. असे असतांना विशेष अन्वेषण पथकाने आश्रमात येऊन चौकशी केल्यावर तेथे ही औषधे मोठ्या प्रमाणात सापडली, असा दावा न्यायालयात केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या क्लिनिकल हिप्नोथेरपी या ग्रंथातील सोयीस्कररित्या संदर्भ देत ही औषधे दिल्यास रुग्ण काहीही करण्यास सिद्ध होतो. ही औषधे संमोहनासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे आश्रमातील या औषधांचा वापर संमोहनासाठी करण्यात येतो, हे तपासावे लागेल, असा अजब दावा सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९६ मध्ये संकलित केलेल्या अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन या ग्रंथात लिहिले आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १९६७ ते १९८२ या १५ वर्षांत संमोहन उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, जवळजवळ ३० टक्के रुग्ण नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाहीत. कालांतराने हेच रुग्ण आध्यात्मिक साधना केल्याने बरे झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्या हेही लक्षात आले की, मनोविकारावरील संमोहन उपचारशास्त्रापेक्षा अध्यात्म हे उच्च प्रतीचे शास्त्र आहे. डॉ. आठवले यांनी जिज्ञासू वृत्तीमुळे अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला, तसेच स्वतः साधना केली. अध्यात्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती आल्यानंतर त्यांनी वर्ष १९९३ मध्ये संमोहन उपचारतज्ञ म्हणून कार्य करणे बंद केले आणि त्यांचे अध्यात्मप्रसाराचे कार्य आजही चालू आहे. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्म या विषयावर २८४ ग्रंथ संकलित केले असून त्यांच्या जून २०१६ पर्यंत १५ भारतीय भाषांत ६५ लाख ७१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत आणि जर्मन अन् स्पॅनिश या भाषांत ६ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. याउलट संमोहनविषयक केवळ ६ ग्रंथ संकलित केले आहेत. या ग्रंथांतही साधनेसाठी आवश्यक अशी स्वभावदोष निर्मूलनाची माहिती दिली आहे. असे असतांना विशेष तपास पथक औषधांचा उल्लेख करून ज्या पद्धतीने सनातनच्या आश्रमात संमोहित केले जात असल्याचा दावा करत आहे, तो किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येते ! असे अन्वेषण करणारे पोलीस कधीतरी खर्या गुन्हेगारांना पकडून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू शकतील का ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments