चिंचवड (पुणे) येथे शिवसेनेचे चापेकर ब्रदर्स चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन !
चिंचवड : हिंदुस्थानात राहून हिंदूंच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपटातील ऐतिहासिक माहिती वगळण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या संदर्भात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांना शिवसेनेच्या खासदारांसमवेत भेटून शहरवासियांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख श्री. राहुल कलाटे यांनी सांगितले.
चापेकर ब्रदर्स हा चित्रपट २ सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता; पण त्यातील काही ऐतिहासिक घटना असणारी दृश्ये वगळण्याविषयी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने आग्रह धरल्याने त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. त्या ऐतिहासिक घटना वगळल्याने मूळ चित्रपटाचा गाभाच नष्ट होणार आहे. त्यामुळे मूळ चित्रपट जसा आहे, तसाच दाखवण्यात यावा, या मागणीसाठी येथील चापेकर चौक येथे १ सप्टेंबर या दिवशी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्या वेळी श्री. कलाटे बोलत होते. (चापेकर ब्रदर्स चित्रपटातील ऐतिहासिक घटना ठेवण्यासाठी प्रयत्न करणार्या राष्ट्रभक्त शिवसेनेचे अभिनंदन ! अशा विषयांवर शिवसेना सोडल्यास अन्य कोणीही आंदोलन करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या प्रसंगी शिवसेनेचे चिंचवड विधानसभेचे शहरप्रमुख श्री. गजानन चिंचवडे यांनी या चित्रपटातील माहिती सांगून आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात