पिंपरी (पुणे) : नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. सर्व घाटांवर पालिकेने परिपूर्ण सुविधा का पुरवल्या नाहीत, याचा लेखी खुलासा प्रशासनाने करावा. महापालिकेचे कर्मचारी भाविकांना कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करण्याविषयी दबाव आणत आहेत. तरी असा दबाव न घालण्याविषयी अशा कर्मचार्यांना सक्त ताकीद द्यावी. तसेच हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती पालिकेचे कर्मचारी तेथेच आणि परिसरात सोडून गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे श्री गणेशाची घोर विटंबना झाली असून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याचबरोबर सर्व घाटांवर गणेशभक्तांना कोणताही त्रास न होण्यासाठी सर्व मागण्यांची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन समस्त गणेश भक्त, विविध हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांनी १४ सप्टेंबर या दिवशी महानगरपालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या नावे दिले. या वेळी लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. निलेश जोशी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात