नाशिक येथे हिंदु जनजागृती समितीचे पत्रकार परिषदेद्वारे प्रबोधन !
नाशिक : वर्षाचे ३६४ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिस गणेशोत्सव आला की ‘प्रदूषण होते’ म्हणून ओरडायला लागतात. कधी बकरी ईदला वा नाताळाच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आक्षेप घेतला आहे का ? इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याच्या नावाखाली गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करा म्हणणारे ‘इकोफ्रेंडली बकरी ईद साजरी करून मातीची बकरी कापा’, ‘ताबूतांचे पाण्यात विसर्जन करू नका’, ‘ख्रिस्त्यांच्या नाताळच्या वेळेस ‘थर्माकॉल’ आणि ‘प्लास्टिक’च्या साहित्यांचा वापर करू नका’, असेही कधी म्हणत नाहीत.
केवळ हिंदूंच्या सणांना विरोध करून लक्ष केले जात आहे. कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यावर त्यांची पुढे विटंबना होते. हे टाळण्यासाठी गणेशभक्तांनी अनंतचतुर्थीला गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यापेक्षा धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करून श्रीगणेशाची कृपा संपादन करा, असे आवाहन श्री. शशिधर जोशी यांनी केले. नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अखिल भारतीय वैष्णव परिषदचे श्री. दीपक बैरागी, पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. सतीश शुक्ल, शिवसृष्टी बहुउद्देशीय विकास संस्था, कॉलेज रोड, नाशिकचे श्री. प्रफुल्ल पाठक, सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात