पुणे : गणेशोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये उठ, भगिनी जागी हो ! हे पथनाट्य विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये सादर करण्यात आले. या पथनाट्याच्या माध्यमातून सध्या महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यावर उपाययोजना म्हणजेच स्वसंरक्षण हे दाखवण्यात आले.
हे पथनाट्य पाहून अनेक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रेक्षक यांनी उत्स्फूर्तपणे आताच्या काळासाठी आवश्यक असे पथनाट्य ! अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसर या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यांचा ३ सहस्रांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आणि अनेकांनी त्यांच्या भागामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणीही केली.
अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये एक – काश्मीर समस्या, स्वसंरक्षण आणि गणेशमूर्ती विसर्जन आणि स्वसंरक्षण अशा विविध विषयांवर पथनाट्य दाखवण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे विविध ठिकाणी दाखवण्यात आलेल्या पथनाट्याच्या वेळी कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त १ सहस्रांहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.
पुणे शहरातील गरुड गणपति मित्र मंडळ आणि अन्य २ ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांमध्ये, तसेच भोसरी येथील कै. भगवान गव्हाणे मित्र मंडळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या उठ, भगिनी जागी हो ! या पथनाट्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. हे पथनाट्य पाहिल्यानंतर अनेकांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गासाठी नावनोंदणी केली, तर उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. या पथनाट्याचा लाभ एकूण ८५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.
अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपले चालू असलेले देखावे आणि सादर केलेले जिवंत देखावे थांबवून समितीचे पथनाट्य सादर करण्यास अनुमती दिली.
क्षणचित्र – कै. भगवान गव्हाणे मित्र मंडळाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचा सत्कार करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात