पोलिसांनी मोहीम (प्रबोधन) थांबवण्यास सांगितले !
पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते श्रीगणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करण्याचे धर्मशास्त्र भाविकांना सांगून त्यांचे प्रबोधन करतात. सनदशीर मार्गाने होणार्या या मोहिमेला अनंतचर्तुदशीच्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर या दिवशी पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा अन्याय्य वापर करत विरोध केला. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांना श्रीगणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे पुष्कळ कल वाढला. महानगरपालिकेने बांधलेले हौद ओस पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अन्य पोलिसांसमवेत येऊन मोहिमेस विरोध करून ती थांबवण्यास सांगितले. विशेष म्हणजे मोहिमेला आडकाठी करण्यामागील कोणतेही स्पष्ट कारण पोलिसांनी सांगितले नाही. (वैध मार्गाने प्रबोधन करण्यास पोलिसांची आडकाठी का ? पोलिसांच्या अशा मनमानी आणि अन्याय्य वर्तणुकीमुळेच सर्वसामान्यांना त्यांचा आधार वाटत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. भिडे पूल येथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून, तसेच उद्घोषणा करून भाविकांना धर्मशास्त्र सांगून गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करत होते. या वेळी घाटावरील महिला पोलिसाने समितीच्या कार्यकर्त्यांना उद्घोषणा करणे थांबवण्याविषयी सांगितले. नागरिक तिकडेच (नदीकडे) जातील. तिथे गर्दी वाढेल, असे कारण सांगत महिला पोलिसाने समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. (नदीत विसर्जन करणार्यांची गर्दी झाली, तर पोलिसांना काय अडचण आहे ? गर्दी झाली, तर त्याचे सुनियोन करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. पोलीस अधिकार्यांनी मोहीम बंद पाडण्यापूर्वी वस्तुस्थिती काय आहे, याचा विचार करायला हवा होता. कदाचित समितीच्या प्रबोधनामुळे नदीत विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल वाढल्यानेच मोहीम बंद करण्यास सांगितली असावी, असे भिडे पूल येथे मोहीम राबवणार्या समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
४. एस्.एम्.जोशी पुलाजवळील घाटावरही पोलिसांनी अशा प्रकारे मोहिमेस विरोध केला. त्यासाठी प्रारंभी पोलिसांनी मोहिमेसाठीच्या अनुमतीपत्राची मागणी केली. ते दाखवल्यानंतर आम्ही अनुमती कधीही रहित करू शकतो, असे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांना दटावले. (पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा न्याय्य वापर केला, तरच कायद्याचे राज्य अनुभवायला मिळेल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास सांगणार्या कमिन्स संघटनेच्या कर्मचार्यांनाही पोलिसांनी निघून जाण्यास सांगितले.
६. वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन होऊ लागल्यास पोलिसांचे सतर्क रहाण्याचे दायित्व अधिक वाढेल म्हणूनच अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने समितीची सनदशीर मार्गाने चालणारी मोहीम बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. पोलिसांची ही कृती निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात