पुणे : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनेक भाविकांनी परंपरेप्रमाणे गणेशमूर्तींचे नदीमध्ये म्हणजेच वहात्या पाण्यात विसर्जन करत धर्मशास्त्राचे पालन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भिडे पूल, एस्.एम्. जोशी पूल, तसेच आेंकारेश्वर पूल येथील घाटांवर प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. या वेळी मुठा नदीला पाणीही सोडण्यात आले होते.
क्षणचित्रे
१. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे सचिव प्रा. रविकिरण गळंगे यांनी समितीचे प्रबोधन फलक पाहून स्वतःहून लोकांचे प्रबोधन करत वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन केले.
२. एस्.एम्.जोशी पुलाजवळील घाटावर एका व्यक्तीला धर्मशास्त्र सांगून वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे आवाहन केल्यानंतर तिने त्याप्रमाणे कृती केली आणि जातांना समितीच्या कार्यकर्त्यांना प्रसाद देऊन साधकांना नमस्कार केला.
३. आेंकारेश्वर घाट येथे महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तींच्या पूजनासाठी ठेवण्यात आलेले पटल दक्षिण-उत्तर ठेवण्यात आले होते. हे एका भाविकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते तत्परतेने पालटून पूर्व-पश्चिम ठेवले.
४. स्पंदन संस्थेकडून एका भाविकाला बळजोरीने हौदात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास सांगितले जात होते, तसेच मूर्तीच्या गळ्यातील पुष्पहार उतरवले जात होते. तेव्हा त्या भाविकाने तुमच्या हातातील प्लास्टिकचे हातमोजे किती मायक्रॉनचे आहेत, ते आधी पहा आणि मग मूर्तीला हात लावा, असे खडसावले.
५. निर्माल्य गोळा करण्यासाठी पटल पुरवण्यात आले होते; मात्र गणेशमूर्तींच्या पूजनासाठी पुरेशा पटलांची सोय करण्यात आलेली नव्हती.
भाविकांच्या प्रतिक्रिया
१. श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन झाल्याशिवाय मूर्ती स्थापनेचा उद्देश सफल होत नाही. शास्त्रानुसार वहात्या पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करणे योग्यच आहे. हौदात विसर्जन करण्यास सांगणारे लोकांची दिशाभूल करत आहेत. – श्री. रवींद्र आडेप, कर सल्लागार
२. हौदात अमोनियम बायकार्बोनेट टाकले असू देत अथवा नसू देत. आपण आपली परंपरा जपायची. आपल्या समोर मूर्ती नदीत वाहून तरी जाते. हौदातील मूर्तींचे काय होईल, काही सांगता येत नाही. – एक भाविक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात