Menu Close

हिंदूंनो, कर्नाटकमधील प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे भीषण स्वरूप लक्षात घ्या !

anis

महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि काही राजकारणी यांचा विरोध यांमुळे तो कायदा पारित झाला नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही तो कायदा पुढील अधिवेशनात पारित करूच, असे सांगितले आहे. त्यामुळे हिंदूंनी तो कायदा संमत होऊ नये, यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या कायद्याची भीषणता आपण समजून घेतली पाहिजे.

१. अनेक संस्कृती उदयाला येऊन लोप पावणे; परंतु  काळाच्या ओघात अनेक आक्रमणे होऊनही प्राचीन आणि महान हिंदु संस्कृती टिकून असणे

विश्‍वात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप पावल्या; परंतु प्राचीन अन् महान हिंदु संस्कृती नष्ट करणे कुणालाही शक्य झाले नाही. शेकडो वर्षांपासून आणि आजही हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. काही पंथियांनी हिंदु संस्कृतीचा नाश करण्याचा प्रयत्न केला; परंतु आदि शंकराचार्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर मोगल आणि ब्रिटीश यांनी सर्व शक्ती पणाला लावून हिंदु धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न विफल झाले. स्वातंत्र्यानंतर सर्व राजकारणी अल्पसंख्यांकांचे अमर्याद तुष्टीकरण करून हिंदु समाज आणि संस्कृती यांचा विनाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे डाव्या विचारसरणीचे पक्ष नास्तिकवाद पसरवून आस्तिक हिंदूंना नास्तिक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. प्राचीन आणि महान हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे होत असलेले प्रयत्न

२ अ. विरोधकांनी हिंदूंच्या भावनांना किंमत न देणे आणि हिंदु देवतांचा अवमान करणे : वेगवेगळ्या काळात विरोधकांनी हिंदु धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केला. आता हिंदु धर्म आणि हिंदु समाजाचा नाश करण्यासाठी सर्व विरोधक संघटित होऊन प्रयत्न करत आहेत. सर्वपक्षीय राजकारणी अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करून हिंदूंच्या भावनांना किंमत न देणे, हिंदु देवतांचा अवमान करणे अशा गोष्टी करत आहेत.

२ आ. जातीय दंगल नियंत्रण कायद्याचे स्वरूप भीषण असणे आणि हिंदु संघटनांच्या संघटित लढ्यामुळे तो कायदा संमत न होणे : आता हे सर्व प्रयत्न करूनही हिंदु धर्म नष्ट करण्यात यश न आल्याने संविधानाच्या नावाखाली कायदा करून हिंदु समाज आणि संस्कृती नाशाचे एक भयंकर अन् सुनियोजित षड्यंत्र रचले जात आहे.

आधीच्या काँग्रेस सरकारने जातीय दंगल नियंत्रण कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता. या कायद्याची भीषणता इतकी होती की, तो कायदा संमत झाला असता, तर बहुसंख्य हिंदूंना त्यांच्यावरील अत्याचार निमूटपणे सहन करावे लागले असते. त्या विरोधात लढा दिल्यास बहुसंख्य हिंदूंना कारावास अथवा शिक्षा भोगावी लागली असती; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित लढ्यामुळे तो कायदा संमत झाला नाही. ही सरकारे काही झाले, तरी हिंदु संस्कृतीचा नाश करायचाच, असा वसा घेतल्यासारखी वागत आहेत.

३. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणजे हिंदु समाजाच्या  आचार-विचारांवर निर्बंध घालण्याचे सरकारचे षड्यंत्र !

सरकार त्यांना पाठिंबा देणार्‍या हिंदु धर्माच्या विदेशी विरोधकांसह एकजूट करून हिंदु समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना नष्ट करण्याच्या प्रयत्नानंतर हिंदु समाजाच्या आचार-विचारांवर निर्बंध घालण्याचे षड्यंत्र रचत आहे. त्याचा परिणाम म्हणजे सरकारने पारित केलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ! एकेका राज्यात हा कायदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात हा कायदा आणल्यानंतर आता कर्नाटकात प्रयत्न होत आहे. पुढे सर्व राज्यांमध्ये हा कायदा येण्याची शक्यता आहे.

३ अ. सरकारने समाजात अल्पांशाने टिकून असलेली श्रद्धा संपवण्यासाठी कायदा करून भीती निर्माण करणे : सध्या हिंदू आपल्या संस्कृतीचा विनाश करण्याच्या प्रयत्नांना फसून पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार वागू लागले आहेत. हिंदू कर्महिंदू न होता केवळ जन्महिंदू झाले आहेत. युवा पिढी पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करून अनेक व्यसनांना बळी पडून भोगवादी जीवन जगत जीवन व्यर्थ घालवत आहे. अशी स्थिती असूनही काही जण हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगून व्रते आणि सण यांचे पालन करत आहेत. त्यामुळे समाजात अल्प प्रमाणात का होईना, आस्तिकता, श्रद्धा, भक्ती टिकून आहे. हे संपवण्यासाठी कायद्याने भीती निर्माण करून आखलेले सुनियोजित षड्यंत्र म्हणजे हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे.

३ आ. समाजाने या कायद्याची भीषणता समजून घेणे आवश्यक ! : या कायद्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय ?, हे स्पष्ट केलेले नाही. हा कायदा आल्यानंतरही मूळ नियम सोडून पुढे या कायद्याच्या प्राधिकाराला (मुखत्यारीला) नवे नियम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परिणामस्वरूप हिंदूंची अनेक व्रते, उत्सव आणि प्रथा यांना (धर्माचरणाला) अंधश्रद्धा ठरवले जाऊ शकते. त्यामुळे हिंदूंमध्ये धर्माचरण कसे करायचे ?, याविषयी गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण होईल. भक्तीपेक्षा भीती वाढेल. या भीतीमुळे हिंदु समाज एकेक धार्मिक कृती करायची सोडून देईल. अशा रितीने हिंदु संस्कृती नष्ट करण्याचे हे षड्यंत्र यशस्वी होईल. असे होऊ नये, यासाठी या कायद्याची भीषणता समाजाने समजून घेतली पाहिजे.

३ इ. धार्मिक विधी करण्यावर निर्बंध आणून हिंदूंना भगवंताकडून मिळणारा चैतन्याचा स्रोत नष्ट करण्याचे षड्यंत्र : या कायद्यामुळे अनेक हिंदू धर्माचरण करणे थांबवतील. त्यामुळे भगवंताकडून येणारे चैतन्य त्यांना मिळणार नाही. यामुळे अधिकतर हिंदू धर्माभिमानशून्य होऊन आध्यात्मिकदृष्ट्या शक्तीहीन होतील. त्यामुळे हे केवळ धार्मिक कृती कायद्याने थांबवण्याचे षड्यंत्रच नव्हे, तर हिंदूंना मिळणार्‍या चैतन्याचा स्रोत थांबवण्याचेही षड्यंत्र आहे. हिंदूंमध्ये धर्माचरणामुळेच आत्मबळ जागृत होऊन त्यातून त्यांना शक्ती प्राप्त होत असते.

३ ई. संतांच्या अपमानाचे महत्पाप हिंदूंना भोगावे लागेल ! : अध्यात्म हे सूक्ष्म स्तरावरील शास्त्र आहे. साधना करून त्याचा प्रसार करणे हा अपराध आहे, अशा आशयाचा या कायद्यात उल्लेख आहे. अध्यात्म हे सूक्ष्म असल्याने अनेक विचार विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येत नाहीत. विज्ञान थिटे पडते. आजपर्यंत अनेक संत-महात्म्यांनी आध्यात्मिक बळावर चमत्कार करून भगवंताचे अस्तित्व सिद्ध करून अमूल्य देणगी दिली आहे. प्रस्तुत कायद्यानुसार असे चमत्कार संतांनी सिद्ध करावेत, असे सांगितले जाईल. विज्ञान थिटे असल्याने ते सिद्ध करणे शक्य नसल्याने खर्‍या संतांना कारागृहात जावे लागण्याची शक्यता आहे. संतांकडून मिळणारे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्यापासून हिंदु समाज वंचित राहील. त्यामुळे हिंदु समाजाची अपरिमित हानी होईल. एवढेच नव्हे, तर संतांच्या या घोर अपमानाचे महत्पाप हिंदु समाजाला भोगावे लागेल.

३ उ. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आस्तिक समाजाला नास्तिकतेकडे वळवणे डाव्या विचारसरणीच्या लोकांना साध्य होईल ! : या कायद्याचा आणखी एक भीषण परिणाम म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदु धर्माचरण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रितीने अंधश्रद्धा आहे, असा प्रचार करून हिंदु समाजात संस्कृतीविषयीचा अभिमान अल्प करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे धर्माचे शिक्षण न मिळाल्याने संभ्रमित झालेल्या हिंदु समाजावर आणखी मोठा आघात होऊन धर्माविषयीचा अभिमान नष्ट होईल आणि अधिक हिंदू नास्तिक होतील. हिंदु समाजाला नास्तिकवादाकडे वळण्याची प्रेरणा दिल्यासारखे होईल. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदु धर्माचरणाविषयी अपप्रचार, कायद्याची भीती आणि धर्माचरणाला अंधश्रद्धा म्हणून निर्बंध, यांमुळे हिंदु समाजात नास्तिकवादाचा प्रसार करणे डाव्या विचारसरणीच्या लोकांना साध्य होईल.

३ ऊ. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे व्यापक रूप : त्यामुळे हिंदूंनो, या कायद्याची भीषणता जाणून घ्या. कायद्यातील केवळ २-३ कलमांच्या परिच्छेदाविषयीच येथे उल्लेख केला असून त्याची भीषणता समजावून सांगण्यात आली आहे. इतर कलमांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्राधिकाराला देण्यात येणारे अधिकार, अजामीनपात्र वॉरंट, पीडिताला नव्हे, तर तिसर्‍या व्यक्तीला केस दाखल करण्याचा अधिकार, हानीभरपाईचा हक्क, अपराध सिद्ध होण्याआधीच हानीभरपाई करणे, अशी अनेक कलमे या कायद्यात आहेत. याविषयी विवरण देण्यास अनेक पृष्ठे लागतील. (विस्तारभयास्तव येथे एवढेच दिले आहे.)

४. सर्व हिंदूंनी हा कायदा पारित होऊ नये, यासाठी लढा देऊन धर्मरक्षणाचे कार्य करणे आवश्यक !

हा कायदा होऊच नये; म्हणून सर्व हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजे. कायद्याने हिंदु धार्मिक कृतींवर निर्बंध आणण्याचे षड्यंत्र, भगवंताकडून मिळणारे चैतन्य थांबवण्याचा प्रयत्न, संतांचा होणारा घोर अपमान आणि त्यामुळे आपल्याला लागणारे पाप, समाजात नास्तिकवाद पसरविण्याचा प्रयत्न आदी षड्यंत्रांना सनदशीर मार्गाने विरोध करून धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हे हिंदूंनी जाणले पाहिजे आणि त्या दृष्टीने गतीने प्रयत्न केले पाहिजेत.
– श्री. हर्षवर्धन शेट्टी, हासन, कर्नाटक. (२१.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *