थेरगाव घाटावरील प्रबोधन मोहीम थांबवण्यासाठी पोलिसांचा दबाव
चिंचवड : येथील थेरगाव घाटावर पिंपरी-चिंचवडमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाविकांना धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याचे आवाहन करत प्रबोधन मोहीम राबवली. यामुळे मूर्तीदान करण्याकडे नागरिकांचा ओघ न्यून होऊ लागला तेव्हा पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना ही मोहीम थांबवण्यास सांगितले. त्याचवेळी संस्कार प्रतिष्ठानकडून राबवण्यात येणार्या मूर्तीदानाच्या मोहिमेस मात्र पोलिसांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी ठाम भूमिका घेत तुम्ही आधी संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनाही घाटाच्या बाहेर काढा. मग आम्हीही जाऊ असे सांगितले. यानंतर मात्र पोलिसांनी माघार घेतली. (पोलिसांच्या अन्याय्य दबावाला बळी न पडता ठामपणे योग्य बाजू पटवून देणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) भाविकांचा श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याकडे कल वाढल्यानंतर संस्कार प्रतिष्ठानलाही गाशा गुंडाळावा लागला.
संस्कार प्रतिष्ठानकडून भाविकांची फसवणूक !
नदीचे होणारे कथित प्रदूषण टाळण्यासाठी संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्ती ३ वेळा बुडवून बाजूला ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते. या मूर्तींचे पुढे तळ्यामध्ये विधिवत विसर्जन केले जाईल, असेही सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र विधिवत विसर्जन न करता एका तळ्यामध्ये प्रतिष्ठानकडून श्री गणेशमूर्ती अक्षरशः फेकून दिल्या जात होत्या. या संदर्भातील चित्रफीत उपलब्ध झाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांकडून त्याचा आधार घेऊन भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठानचे खरे स्वरूप समजल्यानंतर भाविकांचा परंपरेप्रमाणे नदीत विसर्जन करण्याचा कल वाढला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात