दुसरे राज्यस्तरीय पंचगव्य चिकित्सा संमेलन !
विटा (सांगली जिल्हा) : विटा येथे गुरुकुल, गोशाळा, चिकित्सालय चालू करण्याच्या दृष्टीने संभाव्य जागांची पाहणी केली आहे. याविषयी मी पूर्ण संतुष्ट आहे. लवकरच विटा येथे सर्व सुविधांनी युक्त चिकित्सालय आणि गुरुकुल चालू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने त्या भागातील गव्यसिद्धांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन पंचगव्य गुरुकुलमचे गुरुकुलपती सेवारत्न गव्यसिद्धाचार्य पू. डॉ. निरंजनभाई वर्मा यांनी केले. ते दुसर्या राज्यस्तरीय पंचगव्य चिकित्सा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हे संमेलन विटा नगरपरिषदेच्या अल्पबचत सभागृहात होत आहे.
पहिल्या सत्रात मान्यवरांंच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. या वेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. सदाशिवराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री. देवदत्त राजोपाध्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गव्यसिद्ध श्री. विकास तारळेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
या वेळी पू. डॉ. निरंजनभाई वर्मा म्हणाले, केवळ १४ जिल्हे असलेल्या केरळ राज्यातील १२ जिल्ह्यांत पंचगव्य चिकित्सेचे कार्य व्यापक प्रमाणात चालू आहे. तेथील कार्यकर्त्यांनी गाय हेच आपले ध्येय ठेवल्याने त्यांच्याकडून एवढ्या व्यापक प्रमाणात कार्य होऊ शकले. पैसा, व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा यांच्याऐवजी गोमाता आणि गोचिकित्सा हाच कार्याचा केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी असे कार्य वाढवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. या वेळी पू. डॉ. निरंजनभाई वर्मा यांनी गव्यसिद्धांच्या शंकांचे समाधान करून गव्यसिद्धांचे ज्ञान परिपूर्ण होण्यासाठी नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात