रा.स्व. संघाच्या शिवशक्ती संगमात १ लाख ५८ सहस्रांहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवकांचा जनसमुदाय
मारुंजी (जिल्हा पुणे) : हिंदुत्वाच्या अर्थात् भारतीय संस्कृतीच्या पायावरच संपन्न राष्ट्राची निर्मिती करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. भारतीय संस्कृतीच्या धाग्याने सर्व समाजाला गुंफायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने ३ जानेवारी या दिवशी मारुंजी (जिल्हा पुणे ) येथे पार पडलेल्या विराट शिवशक्ती संगम कार्यक्रमात ते बोलत होते.
मोहन भागवत पुढे म्हणाले,
१. सामाजिक समरसता आणि समता प्रस्थापित झाल्यानंतरच संपन्न राष्ट्राची निर्मिती होऊ शकेल. ही समता केवळ कायद्याने येणार नाही, तर मनातून ही विषमता गेली पाहिजे.
२. शक्तिमान राष्ट्र्रांच्या चुकाही दुर्लक्षिल्या जातात, तर दुबळ्या राष्ट्र्रांच्या चांगल्या कामांचीही दखल घेतली जात नाही. त्यामुळेच शक्ती आणि शिव म्हणजेच चारित्र्य या दोन्ही गोष्टींची आज आवश्यकता आहे. जग त्यामुळे भारताकडे आशेने पहात आहे.
३. छत्रपती शिवाजी महाराज यांनी न्याय आणि नीतीने राज्यकारभार कसा करायचा, याचे आदर्श उदाहरण घालून दिले. म्हणून शिवाजी महाराजांची स्थापना आपल्या मनात केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आधी शक्ती निर्माण केली. शक्तीशिवाय जग मान्यता देत नाही. शक्तीमुळेच सत्याला किंमत प्राप्त होते. आपल्याकडे त्याग आणि चारित्र्य यांना किंमत आहे. शक्तीचा उपयोग कसा करायचा, हे शिलातून येते आणि शिलसंपन्नता ही सत्याच्या आचरणातूनच येते.
४. आपला देश विविधतेने नटलेला आहे. त्याकडे आपण सम दृष्टीने पाहिले पाहिजे. सामाजिक एकतेतून शक्ती प्राप्त होते. संघटित समाज समर्थपणे उद्दिष्ट प्राप्त करतो.
५. समाज जागल्याने देशाची उन्नती होते. शासन आणि नेते यांमुळे उन्नती होत नाही. नेत्यांनी चांगले वागायचे असेल, तर समाज जागृत पाहिजे. चारित्र्यसंपन्न आणि चांगल्या व्यक्ती असतील, तर त्यांच्या आदर्शावर चांगला समाज निर्माण होतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
६. विदेशी शक्तीमुळे नव्हे, तर आपल्यातील काही विकृतींमुळे आपण पराभूत होतो. त्या विकृती काढून टाकल्या पाहिजे.
शिवशक्ती संगमाला उपस्थित मान्यवर
संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री मंत्री गिरीश बापट, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार मेधा कुलकर्णी, प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, प.पू. भय्यूजी महाराज, समर्थभक्त पू. सुनीलजी चिंचोलकर, पू. फरशीवाले बाबा, पू. कल्की महाराज, शारदा ज्ञानपीठम्चे पंडित वसंतराव गाडगीळ, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात