वॉशिंग्टन : काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला समर्थन मिळत आहे. त्यातच अमेरिकेतील २ लोकप्रतिनिधींनी ‘पाकला आतंकवादाचा पुरस्कार करणारे राष्ट्र’ घोषित करण्यासाठी अमेरिकी संसदेत खाजगी विधेयक सादर केले आहे.
१. अमेरिकेतील पद्धतीनुसार ९० दिवसांत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना या विधेयकावर पाक आतंकवादाला पाठबळ देतो कि नाही यावर अहवाल द्यावा लागणार आहे. त्यानंतर ३० दिवसांत राज्य सचिवांना ‘पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित केले कि नाही’, याचा पाठपुरावा करणारा अहवाल द्यावा लागणार आहे. तसेच घेतलेल्या निर्णयाचे योग्य ते समर्थनही सादर करावे लागणार आहे.
२. टेक्सासमधील लोकप्रतिनिधी टेड पो आणि कॅलिफोर्निया येथील दाना रोहराबॅचर यांनी हे विधेयक सादर केले आहे. पो हे ‘हाऊस सबकमिटी ऑन टेररिझम’चे अध्यक्ष आहेत, तर दाना या स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थक आहेत.
३. टेड पो म्हणाले, “पाकिस्तान बेभरवशाचा सहकारी आहे. अमेरिकेच्या शत्रूंना त्याने सहकार्यच केले आहे. ओसामा बिन लादेन आणि हक्कानी या आतंकवादी गटाशी असलेले संबंध अन् इतर अनेक उदाहरणांवरून पाकिस्तान आतंकवाद विरोधातील लढ्यात कोणासमवेत आहे, हे लक्षात येते. नक्कीच पाकिस्तान अमेरिकेसमवेत नाही.”
४. पाकच्या या विश्वासघातासाठी त्याला साहाय्य देणे आता बंद केले पाहिजे. ‘आतंकवादाचा पुरस्कार करणारे राष्ट्र’, असे नाव त्याला दिले पाहिजे, असेही पो यांनी म्हटले आहे.
५. उरी येथील आक्रमणाच्या संदर्भात टेड पो म्हणाले, “आतंकवाद्यांना सहकार्य करणे आणि त्यांना जागा देणे, या पाकच्या दायित्वशून्य धोरणाचा हा परिणाम आहे. पाकच्या अशा वर्तणुकीचा शेजारी राष्ट्रांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असून भारताने याची मोठी किंमत चुकवली आहे. आम्ही या आक्रमणाचा निषेध करतो.”
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात