पनवेल : रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल, खांदा वसाहत आणि कळंबोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत घेण्यात आलेल्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१. कळंबोली येथील राजे शिवाजीनगर मित्रमंडळ आणि बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळ येथे प्रत्येकी दोन दिवस क्रांतिकारकांची माहिती सांगणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. तसेच बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळात लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाचा १ सहस्र २०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
२. कळंबोली येथील श्री. प्रकाश चांदिवडे यांनी तसेच दर्यासागर मित्रमंडळ, समर्थ मित्रमंडळ, राजे शिवाजी नगर मित्रमंडळ, नवीन पनवेल येथील युथ स्पोर्ट क्लब यांनी गावातील चौकात आणि विसर्जन तलावाजवळ महिलांच्या सुरक्षेसाठी प्रबोधनात्मक फ्लेक्स लावले.
३. हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या अंतर्गत धार्मिक उत्सव स्त्री रक्षण अभियान राबवण्यात आले. शाखेच्या वतीने ७ गणेशोत्सव मंडळांत प्रबोधनात्मक विषय घेण्यात आले. तसेच ६ मंडळांत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. याचा ४०० जिज्ञासूंनी लाभ घेतला. यासाठी बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळाचे श्री. रामदासशेट शेवाळे तसेच राजे शिवाजीनगर मित्र मंडळाचे श्री. सूर्यकांत म्हसकर आणि श्री. गोरख कार्ले यांचे सहकार्य लाभले. कळंबोली येथील धर्माभिमानी सौ. सत्वशीला घोरपडे यांनी प्रबोधनातून प्रेरित होऊन आमच्या वसाहतीतही रणरागिणी शाखेचा कार्यक्रम ठेवा, अशी मागणी केली.
क्रांतिकारकांचे प्रदर्शन पाहून समाजातून आलेल्या प्रतिक्रिया
१. बीमा कॉम्प्लेक्स मंडळ आणि हिंदु जनजागृती समितीने हिंदु संस्कृतीचे जतन करण्याचा राबवलेला उपक्रम भावी पिढीसाठी सतत प्रेरणा देणारा राहील. पुढील कार्यक्रमासाठी आमच्याकडून अनेक शुभेच्छा आणि आभार ! – श्री. एस्.के. जाधव, कळंबोली
२. आजच्या पिढीला हे दाखवण्याची गरज आहे. आजची पिढी संकेतस्थळांवर नको ते पहात असते. आपल्या मागील पिढीने काय केले ते प्रदर्शनाच्या माध्यमातून या पिढीला माहीत होईल. – श्री. शामकांत तांडेल, कळंबोली
आदर्श गणेशोत्सव साजरा करणारे कळंबोली येथील बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळ !
१. या मंडळाने सैराट चित्रपटातील कथेविरोधात प्रबोधन करणारा देखावा सादर केला होता. मुलांच्या अयोग्य वागण्यामुळे आई वडिलांना मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि त्यांना होणारा मानसिक त्रास यात दाखवला होता.
२. थर्माकॉलचा वापर टाळून सजावट करण्यात आली होती तसेच भक्तीगीते लावण्यात आली. विद्युत रोषणाईही अत्यल्प होती. मंडळाच्या आवारात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा होता.
३. विविध मान्यवर, तसेच आमदार मंडळात श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत होते, त्यांनाही सत्कार करतांना केवळ पुष्पगुच्छ देण्यात येत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात