या स्तुत्य प्रयत्नासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘ज्ञानेश्वरी’त समष्टीचा विचार दिला आहे. वारकर्यांनी तो ७२५ वर्षांपासून जपला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी निर्मिलेला ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ हा राज्यातील महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आणि वैभव आहे. तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळ, आळंदी ग्रामस्थ आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी प्रेरित ‘ज्ञानेश्वरी’च्या ७२५ व्या वर्षानिमित्त महापारायण आयोजित केले होते. त्याच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी आणि अन्य मान्यवर यांसह सहस्रो वारकरी उपस्थित होते. प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. ते पुढे म्हणाले की, नद्यांना आपण मातृतुल्य संबोधतो; पण त्यांचे प्रदूषण करून आपणच हानी करत आहोत. नद्यांमधील पाण्याचा अमृतझरा सतत खळखळत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीसह राज्यातील अनेक नद्यांवर भविष्यात ठिकठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा आणि लहान मोठे प्रकल्प भविष्यात उभे रहातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
वारकरी संस्थांच्या जागेवरील आरक्षणांत फेरपालट करणार ! – मुख्यमंत्री
आळंदी शहराच्या विकास आराखड्यात वारकरी धर्मशाळा, मंदिर, शिक्षण संस्था यांच्या जागा या विविध विकासकामांसाठी आरक्षित झाल्या आहेत. वारकरी संस्थांच्या जागेवर अन्यायकारक आरक्षणे झाली आहेत. या आराखड्यात फेरपालट करून वारकरी संस्थांच्या मूळ उद्देशासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून अन्याय दूर केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात