- धर्माभिमानी हिंदूंनो, महिलांना न्याय देण्याच्या नावाखाली हिंदु धर्मावर हेतुपुरस्सर वारंवार आघात करण्याचा निधर्मी (अधर्मी) राजकीय पक्षांचा डाव ओळखा !
- राष्ट्रवादी काँग्रेसकडे आंदोलन करण्यास कोणतेही सूत्र नसल्यामुळेच अशा प्रकारचे धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठीचे आंदोलन केले जाते, असे म्हटल्यास वावगे काय ?
- हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे दर्शवणारी घटना ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीड : श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्यावर जाऊन महिलांनी दर्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शहरातील क्रांतीनगर भागातील श्री हनुमान मंदिर येथे ‘महिलांना प्रवेश बंदी’ असा फलक आहे. ते मंदिर महिलांसाठी खुले करावे, यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अधिवक्त्या हेमा पिंपळे यांनी ३ जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत आंदोलन केले. या वेळी अधिवक्त्या पिंपळे आणि काही महिला यांनी एकत्र येऊन मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. (मशिदीमध्ये महिलांना प्रवेश करण्यास बंदी आहे, तर तेथेही महिलांना प्रवेश मिळण्यासाठी असेच आंदोलन अधिवक्त्या हेमा पिंपळे करतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्या वेळी स्थानिक नागरिक आणि मंदिर व्यवस्थापन यांनी महिलांना प्रवेश नाकारल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आणि व्यवस्थापन समिती यांनी मध्यस्थी केल्याने महिलांनी ते आंदोलन मागे घेतले.
१. शहरातील तहसील कार्यालयाच्या मागे श्री संकल्पसिद्धी हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच ‘स्त्रियांना प्रवेश करण्यास मनाई’ असा फलक लावलेला आहे.
२. ‘मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे’, अशी मागणी करत अधिवक्ता पिंपळे आणि काही महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मंदिर व्यवस्थापन आणि नागरिक यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ‘मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे’, अशी मागणी लावून धरत’ मंदिर उघडून आरती करणारच’, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
३. मंदिर प्रवेशावरून वादविवाद होऊ नयेत; म्हणून दंगल नियंत्रण पथकासह अनेक पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात