नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीच्या गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला यश !
नंदुरबार – अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथील तापी नदीच्या पुलावर हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला प्रतिसाद देऊन ९० टक्के भाविकांनी गणेशमूर्तीचे गौतमेश्वर मंदिराजवळील जलाशयाच्या खोल पाण्यात विसर्जन केले. गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीपूर्वी तापी नदीच्या पात्रात विसर्जन केलेल्या असंख्य मूर्तींची अपुर्या पाण्यामुळेे विटंबना होत होती. यासंदर्भात जागृती करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती.
या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांसह जयबजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष शेखर मराठे, यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत हातात फलक घेऊन पुलावरून गणेशमूर्ती पाण्यात फेकणे अयोग्य असल्याचे सांगितले. तसेच पाणी अपुरे असल्याने नदीपात्राऐवजी जलाशयात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले. वादळी वार्यासह मुसळधार पाऊस असूनही कार्यकर्ते दिवसभर उभे होते.
हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत महामंडळाने १४ सप्टेंबर या दिवशी यासंदर्भातील छायाचित्रे आणि निवेदन प्रशासनाकडे सादर केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, नंदुरबारचे उपविभागीय प्रांताधिकारी गाडे आणि तहसीलदार नितीन पाटील यांनी महामंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून गौतमेश्वर मंदिराजवळील जलाशयाची प्रत्यक्ष पहाणी केली. तसेच तेथे विसर्जन करण्यास अनुमती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात