वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या गणेशमूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !
मुंबई : वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या २१ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतीकारांचे प्रदर्शन आणि धर्माचरणाविषयी लावण्यात आलेले फ्लेक्स अन् प्रवचन यांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आणि गणेशोत्सव यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी हिंदसायकल गणेशोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. संघटन शर्मा, संस्थापक प्रमुख सल्लागार श्री. मोहन म्हामुणकर, सल्लागार श्री. शेखर हुरसाळे, सर्वश्री हरिप्रसाद कस्तुरी, भास्कर जिंदम, हुकूमचंद पाटणवाला, महिला कार्यकर्त्या श्रीमती यामिनी पवार, श्रीमती सुवर्णा सर्वोदय, श्रीमती उल्का कुलकर्णी, श्रीमती सुहानी शर्मा यांनी पुढाकार घेतला. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे उत्सव निर्विघ्नपणे पार पडला.
१. मागील ३ वर्षांपासून हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समिती हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नरत आहे.
२. यंदा गणेशोत्सव समितीच्या वतीने विविध समाज प्रबोधनपर आणि धर्मजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या वतीने सामाजिक संदेश देणार्या ध्वनीचित्र-चकतींच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले होते. या अंतर्गत ‘जी ५ ए फाउंडेशन’ (G 5 A फाउंडेशन) च्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘माझा परिसर माझी जबाबदारी’ हा परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला.
३. गणेशोत्सव समितीने आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभात ‘सनातन संस्था चेन्नई’ न्यासाच्या वतीचे धर्मशिक्षणपर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रवचनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने सौ. विजया शहा यांनी महिलांनी धर्माचरण करण्याचे महत्त्व, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ १२५ हून अधिक महिलांनी घेतला.
४. मंडळाच्या वतीने हिंदु जनजागृती समिती निर्मित क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिकांनी घेतला. धर्मशिक्षण देणारे फ्लेक्सही लावण्यात आले होते. त्यांचाही लाभ बहुसंख्य जिज्ञासूंनी घेतला.
क्षणचित्र : सनातन संस्थेच्या वतीने दाखवण्यात आलेली गणेशोत्सवाची आध्यात्मिक माहिती देणारी ध्वनीचित्र-चकती सर्व भाविकांना आवडली. काहींनी ध्वनीचित्र-चकती पहाण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनाही बोलावून घेतले.
ध्वनीचित्र-चकतीद्वारे श्री गणेशाच्या आध्यात्मिक माहितीचे प्रसारण करून अध्यात्मप्रसार !
हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत शेवटच्या ९ दिवसांत सनातन संस्थानिर्मित श्री गणेशाची आध्यात्मिक माहिती देणार्या ध्वनीचित्रचकतीचे प्रसारण करण्यात आले. त्याद्वारे दर्शनासाठी येणार्या शेकडो भाविकांना गणेशोत्सव साजरा करण्यामागील आध्यात्मिक महत्त्व आणि शास्त्र कळले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात