भांडुप, मीरा रोड आणि कोपरखैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच ‘पिंगा’ या गाण्यात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ, तसेच केंद्रशासनाचे सांस्कृतिक खाते यांच्याकडे तक्रार केली असून इतिहासाचे विकृतीकरण न वगळल्यास ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, यासाठी त्याचप्रमाणे तेलंगणा शासनाचा नाताळच्या निमित्ताने १९५ ख्रिस्ती चर्चसमवेत साजरा करण्यात येणारा कार्यक्रम आणि २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा कार्यक्रम रहित करावा, या मागणीसाठी १३ डिसेंबर या दिवशी भांडुप, मीरा रोड आणि कोपरखैैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलने करण्यात आली.
या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह धर्माभिमानी हिंदूही सहभागी झाले होते. या वेळी मोठ्या संख्येने धर्माभिमानी आणि राष्ट्रप्रेमी हातात फलक घेऊन घोषणा देत होते. हिंदुत्ववाद्यांच्या वरील मागण्यांसाठी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनांवर शेकडो नागरिकांनी या वेळी स्वाक्षर्या केल्या.
हिंदुत्ववादी संघटनांच्या मान्यवरांनी मांडलेले विचार…
भांडुप (प.)
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन बंद करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन शासनाला खडसवावे ! – श्री. प्रभाकर भोसले, शिवकार्य प्रतिष्ठान
आपले मंत्री मतांसाठी आणि अल्पसंख्याकांना खूष करण्यासाठी इफ्तार मेजवान्या करत होते. ते अल्प म्हणून कि काय आता तेलंगण शासन ख्रिस्तांच्या लांगूलचालनासाठी येत्या नाताळात शासकीय तिजोरीतून विनामूल्य कपडेवाटप करणार आहे; परंतु आतापर्यंत एकाही मंत्र्यांनी हिंदूंच्या सणांना असे कार्यक्रम केल्याचेे पाहिले नाही. हे बंद करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन शासनाला खडसवले पाहिजे.
हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांचा अपमान करणार्या निर्मात्यांना वेळीच धडा शिकवा ! – अजय जगताप, भारतमाता सहप्रतिष्ठान
संजय भन्साळींसारख्या विकृत निर्मात्याने जाणूनबुजून आपल्या शूर मराठ्यांचा इतिहास नष्ट करण्यासाठी आगामी चित्रपट बाजीराव-मस्तानीच्या माध्यमातून रचलेले कारस्थान आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्या निर्मात्यांना वेळीच धडा शिकवला, तर यापुढे असे चित्रपट काढण्यास कोणी धजावणार नाही.
इतिहासाचे विकृतीकरण करणार्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी आणि तेलंगण शासनाच्या धर्मभेद करणार्या धोरणांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत असून हिंदुत्ववादी संघटनांनी या विरोधात संघटित व्हायला हवे. – श्री. सुजितराव साठे, श्री शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान
तेलंगणा शासन हे निधर्मी शासन असेल, तर ख्रिसमसनिमित्त ख्रिस्त्यांसाठी कपडे वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ख्रिस्त्यांचे केले जाणारे लांगूलचालन त्यांनी बंद केले पाहिजे, अन्यथा हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने अशा कार्यक्रमांची मागणी होऊ शकते. – श्री. महादेव चाळके, योग वेदांत समिती
सहभागी संघटना : शिवसेना, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, भारतमाता सहप्रतिष्ठान, शिवकार्य प्रतिष्ठान-विक्रोळी, श्री शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान, योग वेदांत समिती, इस्कॉन, सीताराम सेवा संस्था, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
क्षणचित्र : चिन्मय डेकोरेटर्सचे सर्वश्री अजित प्रचुलकर, संतोष साठे आणि प्रमोद शेलार यांनी आंदोलनासाठी विनामूल्य ध्वनीक्षेपण यंत्रणा उपलब्ध करून ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले.
मीरा रोड (पू.)
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटातून हिंदूंना चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न ! – श्री. दिनेश सोलंकी, हिंदु एकता मंच
जीवनकाळात एकही लढाई न हरणार्या बाजीराव पेशवे यांना चित्रपटात केवळ मस्तानीचे प्रियकर दाखवून त्यांचे शौैर्य जाणूनबुजून दाखवण्यात आलेले नाही. अशा चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यातून हिंदूंना चुकीची दिशा देत आहे.
इतिहासाच्या विकृतीकरणाच्या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी एकत्र यावे ! – श्री. प्रशांत वैती, हिंदु गोवंश रक्षा समिती
चित्रपटात पेशवेकालीन कुलीन स्त्रियांना सर्वांसमक्ष नाचतांना दाखवून ‘बाजीराव-मस्तानी’च्या निर्मात्यांनी हिंदु संस्कृती आणि आमचे आदर्श पुरुष यांचा अपमान केला आहे. हे षड्यंत्र असून हिंदूंना चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. या इतिहासाच्या विकृतीकरणाच्या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे.
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाला सनदशीर मार्गाने प्रखर विरोध करून हिंदूंनी क्षात्रवृत्ती दाखवावी ! – श्री. बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती
इतिहास हा केवळ भूतकाळातील नसून तो भविष्यकाळात मार्गदर्शन करण्याचा दीपस्तंभ आहे. इतिहासाचे विकृतीकरण करून हिंदूंची भावी पिढी क्षात्रहीन बनवण्याचे हे षड्यंत्र इंग्रजांच्या काळापासून रचले जात आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटातील विकृतीकरण हे त्याचेच उदाहरण आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाला सनदशीर मार्गाने प्रखर विरोध करून हिंदूंनी क्षात्रवृत्ती दाखवावी आणि असे विकृतीकरण पूर्णपणे थांबवण्यासाठी अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहावे.
सहभागी संघटना : बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जागरण मंच, हिंदू एकता मंच, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
क्षणचित्र : मीरा रोड येथे प्रथमच राष्ट्रीय हिंदू आंदोलन होत होते. असे असतांनाही त्याला हिंदु बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या प्रसंगी अनेक जण विषय जाणून घेऊन स्वाक्षरी मोहिमेत उर्त्स्फूतपणे सहभागी झाले.
कोपरखैरणे
‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही ! – श्री. अजय बर्गे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
इतिहासाचे विकृतीकरण थांबवणे आकश्यक आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाचा आणि त्याच्या निर्मात्याचा आम्ही धिक्कार करत असून तो मुंबईत प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. बाजीरावांनी अनेक लढाया जिंकल्या, याविषयी काहीही न दाखवता केवळ त्यांचे प्रेम प्रकरण दाखवून एकप्रकारे विडंबनच करण्यात येत आहे. ‘आपल्यावर वेळ आली, की बघू’, अशी हिंदूंची बनलेली मानसिकता सोडून दिली पाहिजे.
खोटा इतिहास दाखवल्याने तरुण पिढी भरकटत आहे ! – श्री. अस्मित कोंढाळकर, धर्माभिमानी
चित्रपट निर्मात्यांनी खोटा नव्हे, तर खरा इतिहास दाखवला पाहिजे; मात्र ते केवळ पैसे कमवण्यासाठी खोटा इतिहास दाखवतात. त्यामुळेच तरुण पिढी भरकटत आहे. आपण खरा इतिहास समाजापुढे आणला, तर तरुण जागा होऊन हिंदु राष्ट्र निर्माण होईल, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे ते खरा इतिहास दडवून ठेवत आहेत.
इतिहासाचे विकृतीकरण वेळीच थांबवणे आवश्यक !- श्री. मंगेश म्हात्रे, हिंदु महासभा, अध्यक्ष, नवी मुंबई
इतिहासाच्या विकृतीकरणाचा भावी पिढीवर दूरगामी परिणाम होतो. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून केले जाणारे विकृतीकरण वेळीच थांबवणे आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. शासनाने केवळ एखाद्या विशिष्ट धर्माचे उत्सव साजरे करणे चुकीचे असून त्यातून असहिष्णुता वाढीस लागू शकते. यालाही प्रखरपणे विरोध करणे आवश्यक आहे.
इतिहासाचे विकृतीकरण करणार्या ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली पाहिजे ! – श्री. सागर पाटील, शंभूराजे प्रतिष्ठान
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात काशीबाईंना नाचतांना दाखवून खोटा इतिहास समाजासमोर मांडला आहे. अशा चित्रपटावर त्वरित बंदीच हवी ! – श्री. महेश थोरात, युवा मित्र सेना
सहभागी संघटना : युवा मित्र सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शंभूराजे प्रतिष्ठान, हिंदु महासभा, शिवसाधना समूह, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती
क्षणचित्र – आंदोलनस्थळी येतांना ‘शंभूराजे प्रतिष्ठान’ चे युवक मोठ्या संख्येने घोषणा देत सहभागी झाले होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात