श्री दुर्गामाता दौडीचा पहिला दिवस
सांगली : आज हिंदु समाजाला धर्म, संस्कृती यांच्याशी काही देणे-घेणे राहिले नसून तो संकुचित झाला आहे. राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू शकतो. तरी श्री दुर्गामातेने त्यासाठी आपल्याला शक्ती द्यावी, असे मागणे मागण्यासाठी आपण इथे आलो आहोत, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. ते श्री दुर्गामाता मंदिराच्या समोर धारकर्यांना मार्गदर्शन करतांना पहिल्या दिवशी बोलत होते. आजच्या दौडीसाठी सांगली विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. प्रारंभी लववेना हे शीर माते हे गीत एका धारकर्याने सादर केले.
२. उरी आक्रमणात धारातीर्थ पडलेले सैनिक आणि श्री दुर्गामाता मंदिराचे प्रमुख कै. मदनलाल नावंधर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
३. पू. भिडेगुरुजी यांनी म्हटलेल्या हे हिंदु राष्ट्र करण्या… या गीताने सर्वांमध्ये राष्ट्रप्रेमाची उर्मी जागृत झाली.
मिरज येथे रणरागिणी शाखेच्या वतीने दौडीचे स्वागत !
मिरज : येथे ब्राह्मणपुरी येथील श्री अंबामाता मंदिराच्या जवळ रणरागिणी शाखेच्या वतीने औक्षण करून दौडीचे स्वागत करण्यात आले. रणरागिणीच्या शाखेच्या सौ. अंजली जोशी, सनातन संस्थेच्या कु. प्रतिभा तावरे, सौ. कल्पना थोरात, श्री. गिरीश पुजारी, तसेच अन्य उपस्थित होते. या वेळी सर्वश्री विनायक माईणकर, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब विभूते, सुनील ढोबळे, विनायक कुलकर्णी, भाजपचे सर्वश्री तानाजी घार्गे, सचिन चौगुले, तसेच सर्वश्री संतोष लामदाडे, धनंजय सातवेकर, शुभम भोरे यांसह अन्य उपस्थित होते. शिवतीर्थापासून चालू झालेल्या दौडीचा समारोप श्री अंबामाता मंदिरापाशी झाला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात