Menu Close

घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी उघड करणारा ‘सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालया’चा अहवाल !

anis

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करण्यासंदर्भात डोंबिवली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. सुधांशू जोशी, रायगड येथील राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापूमहाराज रावकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी विविध शासकीय खात्यांमध्ये तक्रारी केल्या होत्या.

या प्रकरणी सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरिक्षकांचा चौकशी अहवाल माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाला आहे. यातून या गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. अंनिसच्या न्यासाच्या कारभारात घोटाळा झाल्याचे सनातनने वारंवार आरोप केले होते. त्याला यामुळे पुष्टी मिळाली आहे.

हा अहवाल येथे सादर करत आहोत. अहवालातील शासकीय भाषा तशीच ठेवली आहे, याची वाचकांनी येथे नोंद घ्यावी.

अहवाल सादर करतांना दिलेली पार्श्‍वभूमी

१. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र) सातारा या न्यासात झालेल्या विविध घोटाळ्याच्या प्रकरणी विश्‍वस्त आणि तक्रारदार यांनी सादर केलेले म्हणणे आणि या कार्यालयातील अभिलेखा व कागदपत्रे यांचा विचार करून खालीलप्रमाणे वस्तूस्थितीदर्शन एकत्रित अहवाल सादर करण्यात येत आहे.

२. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र), १५५, सदाशिव पेठ, सातारा हा सार्वजनिक न्यान नोंदणी क्रमांक ई/४६१/सातारा या क्रमांकाने दिनांक ३०.६.१९९२ या दिवशी नोंदवण्यात आलेला आहे.

न्यास नोंदणीचे वेळी खालीलप्रमाणे एकूण ८ लोकांची न्यासाचे विश्‍वस्त म्हणून नोंद केलेली आहे.

१. श्री. प्रतापराव पवार, ५६८, बुधवार पेठ, पुणे.
२. श्री. निळूभाऊ लिमये, पुनम हॉटेल, डेक्कन जिमखाना, पुणे.
३. श्री. निळू फुले, सोनाई, आयडीयल कॉलनी, पौड फाटा, पुणे.
४. डॉ. राम ताकवले, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, नाशिक.
५. श्री. राजा पाटील, राजाबडे चौक, बॉम्बे डाईंग शोरूम, दादर, मुंबई.
६. श्री. सदाशिव अमरापूरकर, पंचधारा, वर्सोवा, अंधरी, मुंबई.
७. डॉ. विद्याधर बोरकर, ११, स्वप्ननंदा हौ. सोसायटी, कोथरूड, पुणे.
८. डॉ. नरेंद्र दाभोलकर, १५५, सदाशिव पेठ, पुणे.

विश्‍वस्त मंडळाच्या निवडीविषयी अंनिसच्या न्यासाने केलेली तरतूद

न्यासाच्या घटनेचे अवलोकन करता न्यासाचे विश्‍वस्त मंडळ कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १३ लोकांचे असून प्रथम विश्‍वस्त मंडळ तहहयात राहील. पहिल्या ५ वर्षांनंतर विश्‍वस्त मंडळातील २ विश्‍वस्त निवृत्त होतील व त्यांच्या जागी उरलेले विश्‍वस्त बहुमताने नवीन विश्‍वस्तांची निवड करतील. त्यानंतर याच पद्धतीने २ विश्‍वस्त निवृत्त होऊन नवीन विश्‍वस्त निवडण्यात येतील; मात्र निवृत्त होणारे विश्‍वस्त पुन्हा विश्‍वस्त निवडण्यास पात्र असतील, अशी तरतूद असल्याचे दिसून येते.

अंनिसच्या न्यासाने सोयीस्कररित्या इतिवृत्तात सुधारणा केल्याचे आणि तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे नमूद !

न्यासाच्या विश्‍वस्तांनी विश्‍वस्तांमधील बदलाबाबत बदल अर्ज कार्यालयात सादर केले. प्रस्तुत बदल अर्जाचे अवलोकन करता, सदरचे बदल अर्ज विलंबाने दाखल करण्यात आल्याचे दिसून येते. बदल अर्जासोबत सादर केलेल्या सभेच्या इतिवृत्तामध्ये काही ठिकाणी खाडाखोड झाल्याचेही सकृत दर्शनी दिसून येते. शिवाय सभा संपल्यानंतर पुन्हा सभेचे इतिवृत्त लिहिण्यात आल्याचे दिसून येते. एकंदरित बदल अर्ज वेळेत दाखल न करता विश्‍वस्तांनी विलंबाने आणि सोयीस्कररित्या इतिवृत्तामध्ये दुरुस्ती करून दाखल केले आहेत, या तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे सकृतदर्शनी आढळून येते. तथापि सदरचे बदल अर्जांची धर्मादाय आयुक्त, सातारा यांच्यासमोर न्यायिक चौकशी चालू असल्याने बदल अर्जांचा गुणदोषावर न्यायनिर्णय अद्याप झालेला नसल्याने त्याबाबत भाष्य करणे उचित वाटत नाही.

अंनिसच्या न्यासाने हिशोबपत्रके नियमितपणे आणि प्रतिवर्षी सादर केली नसल्याचे अहवालात नमूद !

या कार्यालयातील उपलब्ध रेकॉर्ड तपासले असता, विश्‍वस्तांनी वर्ष १९९२ ते २००२ अखेरची हिशोबपत्रके दिनांक १९.९.२००३ या दिवशी विलंबाने दाखल केलेली आहेत. तसेच वर्ष २००३ आणि २००४ या वर्षांची हिशोबपत्रके दिनांक ५.३.२००४, वर्ष २००४, २००५, २००६, २००८, २००९ आणि २०१० या वर्षांची हिशोबपत्रके दिनांक ३.१.२०१२ आणि वर्ष २००७, २०११, २०१२, २०१३ आणि २०१४ या वर्षांची हिशोबपत्रके दिनांक १५.१०.२०१५ या दिवशी दाखल केल्याचे दिसून येते. प्रस्तुत हिशोबपत्रकांसोबत विश्‍वस्तांनी विलंब माफीचा अर्ज सादर केल्याचेही दिसून येते. सदर अर्जावर मा. साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा यांनी दिनांक ५.१०.२०१५ या दिवशी आदेश पारित करून हिशोबपत्रके रुपये ५०० विलंब शुल्क आकारून स्वीकारण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार हिशोबपत्रकाच्या नोंदी परिशिष्ट १० वर घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र न्यासाने हिशोबपत्रके नियमितपणे आणि दरवर्षी सादर केलेली नाहीत, या तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे दिसून येते.

कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळवणारा; मात्र अंशदान न भरणारा अंनिसचा न्यास !

न्यासाने प्रत्येक वर्षी हिशोबपत्रके वर्ष संपल्यापासून ६ मासांच्या (महिन्यांच्या) आत दाखल करणे आवश्यक असतांना हिशोबपत्रके विलंबाने दाखल केली आहेत. तसेच न्यासाचा उद्देश मिश्र स्वरूपाचा असतांना हिशोब तपासनीसाने न्यासाचे उद्देश शैक्षणिक दाखवले आहेत. वर्ष १९९२ ते २००४ अखेर हिशोबपत्रके वर्ष २००३ या वर्षी दाखल केलेली असून लेखापाल यांनी शैक्षणिक बाब म्हणून अंशदानातून सूट दाखवली आहे. वास्तविक न्यासाकडून २ टक्के दराने अंशदानाची वसूली करणे आवश्यक होते, अशी तक्रारदाराची तक्रार आहे. याबाबत असे सादर करण्यात येते की, न्यासाने वर्ष १९९२ ते २०१५ अखेरची हिशोबपत्रके कार्यालयास दाखल केलेली आहेत. न्यासाच्या उत्पन्नावर अंशदान आकारणी करण्याबाबत मा. धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडील पत्र जावक क्र. अंदाज/अंशदान/७३३८/२०१० दिनांक २९.११.२०१० नुसार मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील जनहित याचिका क्र. ४०/२००७, १८६४/२००७ आणि १७८०/२००६ मधील दिनांक २५.९.२००९ या दिवशीच्या आदेशानुसार न्यासाकडून अंशदान वसूलीस स्थगिती देण्यात आलेली आहे. तथापि सदर याचिकेमधील अंतिम आदेशास अधीन राहून अंशदान आकारण करून सद्य:स्थितीत अंशदान भरून घेणे वा त्याबाबत कार्यवाही करणे उचित वाटत नाही.

अंनिसच्या न्यासाकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून आणि त्याविषयी नोंद न ठेवून कायद्याचा भंग !

न्यासाच्या उत्पन्नामध्ये सन २००४ पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून न्यासाने मोठ्या रकमेची गुंतवणूक केली आहे, या तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. न्यासाने सादर केलेल्या हिशोबपत्रांची छाननी केली असता न्यासाने ठेवी, कायम ठेव, म्युच्युअल फंड, शेअर्स यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक केल्याचे स्पष्ट होते. तसेच त्याबाबतच्या सविस्तर तपशील दर्शवणार्‍या नोंदवह्या अनुसूची १० अ अ (नियम २१(२) भाग ३ प्रमाणे ठेवलेल्या नसल्याचेही दिसून येते. तसेच त्याबाबतचे विहित बदल अर्ज कार्यालयास सादर केलेले नाहीत. यावरून न्यासाने मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ३५ चे उल्लंघन केल्याचे सकृत दर्शनी दिसून येते.

अंनिसच्या न्यासाला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो !

न्यासाने सादर केलेल्या हिशोबपत्रकावरून न्यासाला मोठ्या प्रमाणात परदेशी देणग्या मिळाल्याचे आढळून येते. तथापि प्रस्तुत न्यासाच्या विश्‍वस्तांचे नक्षलवादी संघटना किंवा ‘फॉरेन मिशनरीज्’ यांच्याशी लागेबांधे आहेत अगर कसे याबाबत भाष्य करता येत नाही; कारण सदरची बाब कार्यालयाशी संबंधित नाही. तसेच नियतकालिके, वार्तापत्र, मुखपत्राबाबत संबंधित नोंदणी कार्यालयास (आर्.एन्.आय) वार्षिक अहवाल सादर करण्याची बाबही या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याने त्याबाबत भाष्य नाही. तथापि सदर साहित्याचे प्रकाशनाचे संपादक हे न्यासाचे विश्‍वस्त असल्याचेही दिसून येते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समिती संचलित ‘वैज्ञानिक जाणीव प्रकल्प’ या नावाने संस्थेने उपक्रम राबवला असल्याचे दिसून येते. तसेच सदर प्रकल्पाद्वारे शाळांमधून स्वयंअध्ययन परीक्षेद्वारे लाखो रुपयांची संपत्ती जमा झाल्याचे न्यासाच्या कीर्द आणि खतावणीरून आढळून येते.

विदेशातून मिळणार्‍या देणग्यांविषयी अंनिसच्या न्यासाने दिलेल्या माहितीत तफावत !

न्यासाची नोंद परकीय चलन नियंत्रण कायदा अन्वये केंद्र शासनाच्या गृह खात्याकडे नोंदणी असल्याचे दिसून येते. तसेच त्याद्वारे लाखो रुपयांच्या देणग्या जमा झाल्या असल्याचेही दिसून येते. तथापि त्याबाबतच्या जमा पावत्या तपासल्या असता सदर पावत्यावर एफ्सीआरए नोंदणी क्रमांक आढळून येत नाही किंबहुना आयकर कायदा कलम ८०(ग) अन्वये नोंदणी क्रमांकही दिसून येत नाही. अशा प्रकारे जमा झालेल्या रकमा न्यासाच्या उद्देशाव्यतिरिक्त इतर उद्देशांवर खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामधून विश्‍वस्तांनी मोठ्या प्रमाणावर मानधन आणि अन्य संस्थांना देणग्यांचे वाटप केल्याचे आढळून येते. त्याबाबतचा ठराव केल्याचे दिसून येत नाही. वर्ष २००६ मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन इंडिया (अमेरिका) यांनी रुपये १० लाख इतकी रक्कम नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे दशकातील सर्वोत्तम कार्यक्रम म्हणून पुरस्कार स्वरूपात दिली. ती सर्व रक्कम त्यांनी न्यासास दिल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात चौकशीमध्ये आणि कागदपत्रे पहाता, वर्ष २००६ या वर्षीच्या ऑडीट रिपोर्टमध्ये अथवा कीर्द खतावणीमध्ये सदरची रक्कम नमूद नसल्याचे दिसून येते. न्यासास परदेशामधून मोठ्या प्रमाणात देणग्या प्राप्त झाल्या आहेत. त्याची माहिती केंद्रीय गृह खात्याला दरवर्षी दिल्याचे संस्थेने जबाबामध्ये नमूद केले असले तरीही सदर दिलेली माहिती आणि न्यासाकडील त्याबाबतची कागदपत्रे, यांमध्ये तफावत असल्याचे आढळून येते.

स्थावर आणि जंगम मिळकतीविषयी माहिती लपवली !

अ. न्यासाच्या कीर्द खतावणीवरून न्यासाने इंडिका क्रूझर गाड्यांवर दुरूस्तीसाठी व्यय (खर्च) केल्याचे दिसून येते. तथापि न्यासाने किती गाड्या घेतल्या आहेत, त्यांची नोंद नोंदवहीमध्ये नाही. त्याचप्रमाणे स्थावर मिळकत आणि जंगम मिळकत, यांबाबतच्या अद्ययावत नोंदवह्या नाहीत किंबहुना त्याबाबचे बदलअर्ज कार्यालयास दाखल केल्याचे आढळून येत नाही.

ब. न्यासाने पथनाट्य, एकांकिका याबाबत संबंधित करमणूक कर खात्याची अनुमती (परवानगी) घेतली किंवा कसे, याबाबत माहिती उपलब्ध होत नाही.

अंनिसच्या न्यासाचा कारभार पारदर्शक नाही !

एकंदरित तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तथ्यच असल्याचे आढळून येते, तसेच न्यासाच्या कारभारामध्ये अनियमितपणा असल्याचे दिसून येते. तथापि तक्रारदार हे प्रस्तुत न्यासाचे सभासद अथवा देणगीदार नाहीत. त्यामुळे तक्रारदार हे कायद्यातील तरतुदीनुसार न्यासाचे हितसंबंधित आहे अगर कसे, हा प्रश्‍न निर्माण होत असला तरीही न्यासाचा कारभार कायद्यातील तरतुदीनुसार आणि पारदर्शकपणे चालू आहे, असा निष्कर्ष काढणे उचित वाटत नाही.

अंनिसच्या ट्रस्टकडून जमा केलेल्या निधीचा दुरुपयोग !

निरीक्षक अहवाल वाचला. सोबतची कागदपत्रे पडताळली. चारही तक्रारअर्ज वाचले. सर्व तक्रारदारांची तक्रार थोड्याफार फरकाने एकाच स्वरूपाची असल्याचे दिसून येते. न्यासाने परदेशातून मोठ्या प्रमाणात अनुदान/देणगी मिळवली असून विविध स्वरूपाचे निधी शासनाकडून आणि शाळांमध्ये जाऊन जमा केले आहेत आणि त्याचा विनियोग ज्या कारणासाठी जमा केले, त्या कारणासाठी केला नाही. त्याचा दुरूपयोग झालेला आहे. अंधश्रद्धा निमूर्लनाच्या नावाखाली मोठे प्रकाशन केले जाते; पण ते न्यासाचे उद्देश नाहीत, अशा स्वरूपाची (थोडक्यात) तक्रार असल्याचे दिसते.

अंशदान न भरून सरकारचे उत्पन्न बुडवणारा अंनिसचा न्यास !

न्यासाचे त्या त्या वेळी ऑडीट केले किंवा नाही, हा संभ्रम आहे; कारण ते विलंबाने दाखल झालेले आढळतात. त्या त्या वेळी दाखल करण्यात आले असते, तर वर्ष २००८ पूर्वीच्या हिशोबपत्रकांची छाननीनंतर त्यांना/न्यासाला अंशदान भरावे लागले असते. कोट्यवधी रुपयांची देणगी उत्पन्नात असतांना वेळेत दाखल न केल्याने या अर्ध्या लक्षाचेही अंशदान न मिळाल्याने (शासनाचे) मोठे नुकसानच झालेले आहे. तसेच वरील तक्रारीत एका तक्रारदाराने अंशदानाची बाबही नमूद केलेली आहे. न्यासाच्या स्थापनेपासून न्यासाचे विश्‍वस्त निधीपत्रात नमूद केल्याप्रमाणे विश्‍वस्तांमधील बदल दाखल केलेले नाहीत.

न्यासावर अधिकृत कार्यकारिणी/विश्‍वस्त नसल्याने प्रशासक नेमणे आवश्यक !

न्यासाची घटना पाहिली असता घटनेप्रमाणे प्रथम विश्‍वस्तमंडळ ५ वर्षे रहाणार असून त्यानंतर दरवर्षी २ विश्‍वस्त निवृत्त होणार आणि त्यांच्याजागी उर्वरित विश्‍वस्त जागा भरणार असल्याचे नमूद आहे; परंतु याप्रमाणे विश्‍वस्तांच्या बदल पूर्वी दाखल झालेले नसल्याने कार्यालयीन रेकॉर्डप्रमाणे न्यासाचे केवळ १-२ विश्‍वस्त दिसतात. इतर सर्व मयत आहेत. दाखल बदल अर्ज मंजूर होईपर्यंत न्यासास कोणीही विश्‍वस्त नाही. ज्या व्यक्ती न्यासाचा कारभार करत आहेत त्या defacto manager (प्रत्यक्षात व्यवस्थापक) आहेत. त्यांनी केलेल्या व्यवहारास त्या जबाबदार रहातील. वरील सद्यःस्थितीवरून असे लक्षात येते की, न्यासास अधिकृत कार्यकारिणी विश्‍वस्त नाहीत. सबब न्यासाचा कारभार पहाण्यासाठी विधी तज्ञांची नेमणूक होणे आवश्यक (प्रशासक म्हणून) आहे.

अंनिसच्या न्यासाची सखोल चौकशी व्हावी, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांचे ताशेरे !

न्यासाने दाखल केलेले ऑडीट रिपोर्ट आणि तक्रारदाराच्या तक्रारीचा स्वरूप पहाता विशेष लेखापरिक्षण होणे आवश्यक वाटते. निरीक्षकांनी अहवाल सादर करतांना /करण्यापूर्वी सर्व तक्रारींच्या अनुषंगाने पावत्या कीर्द, खतावणी, बँकेचे पासबूक इत्यादी तपासणे आवश्यक आहे. असे असतांना निरीक्षकांनी अहवाल मोघम दिलेला आहे. त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केलेली दिसून येत नाही, तसेच सध्या हयात असलेले परंतु स्थापनेच्या वेळच्या विश्‍वस्तांचा जबाब घेतलेला नाही. सबब निरीक्षकांनी पुन्हा चौकशी करून, तपासणी करून अहवाल दाखल करावा, असे आदेश व्हावेत. न्यासाची अभिलेखा पहाता न्यासाचे विलीनीकरण झाले असून जो न्यास (इ-४०७) या न्यासात विलीन झाला आहे त्या न्यासाची मालमत्ता (जंगम/स्थावर) सदर न्यासाच्या रेकॉर्डला येणे आवश्यक आहे. याबाबतही निरीक्षकांनी चौकशी केली नाही आणि अहवाल सादर केलेला नाही. सबब निरीक्षकांनी फेरचौकशी करून अहवाल सादर करावा.

अंनिसच्या न्यासाच्या कारभारात अनियमितता असल्याचे उघड !

एकंदरित उपरोक्त परिस्थितीवरून दिसून येते की,

१. न्यासाने विश्‍वस्तांमधील बदलाबाबत बदल अर्ज मुदतीत दाखल केलेले नाहीत.
२. न्यासाने हिशोबपत्रके वेळेवर आणि नियमितपणे सादर केलेली नाहीत.
३. स्थावर आणि जंगम मिळकतीच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवलेल्या नाहीत, तसेच त्याबाबते बदलअर्ज सादर केलेले नाहीत.
४. न्यासाकडून दरवर्षी अंदाजपत्रक वेळेत सादर केले जात नाही.
५. न्यासाला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळालेल्या असून, तसेच मोठ्या प्रमाणात ठेवी स्वरूपात रक्कम गुंतवलेल्या असतांनाही कर्ज म्हणून काही रकमा घेतल्याचे ऑडीट रिपोर्टवरून दिसून येते. सदरच्या रकमा कोणाकडून आणि कशासाठी घेतल्या, त्याकरिता कायद्यातील तरतुदीनुसार अनुमती (परवानगी) घेतली अगर कसे, याबाबत बोध होत नाही.
६. न्यासाने ठेवी ठेवतांना कलम ३५ चे उल्लंघन केल्याचे दिसून येते. काही रकमा रयत सेवक सहकारी बँक, शामराव विठ्ठल को-ऑप बँक अशा अनेक बँकेत ठेवण्यात आल्या आहेत.
७. हिशोब तपासनीसाने हिशोब पत्रकासोबत परदेशी देणग्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर केलेला नाही.
८. न्यासाने विविध प्रकारचे फंड निर्माण केले आहेत. तथापि त्याबाबत विहित प्रमाणपत्र सादर केलेले नाही.
९. न्यासाने नियमबाह्य अंशदानामधून सूट घेतलेली आहे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *