बीड : झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील १२ मदरशांना ५० लक्ष १५ सहस्र रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. येथील उस्मानिया मदरशात मुलेच आढळून न आल्याने त्यास अनुदानातून वगळण्यात आले.
जिल्ह्यातील मदरशांकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव मागवले होते. त्या प्रस्तावांची जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने छाननी केल्यानंतर ते प्रस्ताव मंजुरीसह आवश्यक निधीच्या मागणीने शासनाकडे पाठवण्यात आलेे. त्यानुसार राज्य शासनाने हा निधी मंजूर केला आहे.
हे अनुदान पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि शिक्षक मानधन आदींसाठी वापरण्यात येणार असून ३ मासांच्या आत प्रस्तावातील नमूद कामे करणे बंधनकारक आहे. तसेच अनुदान वितरित करण्यापूर्वी संबंधित मदरसा सद्यस्थितीत चालू आहेत का, याची निश्चिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्याविषयीही शासन आदेशात नमूद केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात