कोल्हापूर : गणेशोत्सवात होणार्या डॉल्बीला फाटा देत डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी कोल्हापूरनेच पुढाकार घेतला आहे. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या मंडळांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली; मात्र काही मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा वापर केल्याविषयी त्यांच्यावर पर्यावरण कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी कारवाई करावी; मात्र अन्यायकारक कलमे हटवावीत. अन्यायकारक कलमे हटवली नाहीत, तर आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नगरसेवक सर्वश्री रवीकिरण इंगवले, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार श्री. क्षीरसागर म्हणाले की, पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या अटींनुसार मंडळांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा लावली होती; पण मिरवणुकीच्या मध्यरात्री अचानक साहित्य कह्यात घेतल्याने मिरवणूक थांबली. मिरवणूक पुन्हा चालू होण्यासाठी कार्यकर्त्यांची समजूत घालणे महत्त्वाचे होते. त्यामुळे ध्वनीक्षेपक पुन्हा चालू करण्याची अनुमती मिळाली. पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी अन्यायकारक कलमे त्वरित मागे घ्यावीत, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मंडळांची बाजू मांडणार आहे. मंडळांकडून झालेल्या चुकीविषयी आम्ही डॉल्बीचा त्रास झालेल्या नागरिकांची क्षमा मागतो.
नगरसेवक श्री. रविकिरण इंगवले म्हणाले की, मशिदींवरील भोंग्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असतांना त्यांच्यावर पोलीस का कारवाई करत नाहीत ? केवळ हिंदूंवरच कारवाई का केली जाते ? कारखान्यातून दूषित पाणी सोडल्याने नदीचे पाणी दूषित होते, याकडे प्रदूषण मंडळ लक्ष का देत नाही ? मंडळाचे कार्य करणार्या कार्यकर्त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना न्यायालयीन लढाई लढणे अवघड आहे. चंद्रकांत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सांगून गुन्हे मागे घ्यावेत.
पालकमंत्र्यांच्या दारात ठिय्या !
डॉल्बी लावणार्या मंडळांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिलेे होते. या वक्तव्याचा धागा पकडून नगरसेवक रविकिरण इंगवले म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक मंडळांवर कारवाईची भाषा करू नये. आम्ही डॉल्बीच्या विरोधात आहोत; मात्र चुकीची कारवाई झाली, तर सर्व कार्यकर्ते सहकुटुंब आपल्या दारात ठिय्या मांडतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात