पुणे : नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा, उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच दांडिया आणि नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य ती काळजी घेण्यात यावी. उत्सव शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षकांना निवेदने देण्यात आली. या वेळी बहुतांश ठिकाणी पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत समितीच्या कार्याचे कौतुक केले. पुणे शहरातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडकमाळ पोलीस ठाणे, सहकारनगर, दत्तवाडी, स्वारगेट, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, भारती विद्यापीठ या पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात भोसरी, पिंपरी, निगडी, हिंजवडी, वाकड, चिंचवड या पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने देण्यात आली. याचसमवेत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष गुन्हे शाखेलाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सनदशीर मार्गाने कार्य करणार्या कार्यकर्त्यांची (तेच तेच प्रश्न विचारून) चौकशी !
एका पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देणार्या साधकांशी तेथील लिपिकाने अनौपचारिक बोलून चौकशी केली. या वेळी त्यांनी तुमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची यादी आहे का ?, संघटनेत किती जण आहेत ? (एका साधकाचे नाव घेऊन) हे कुठे रहातात ? असे प्रश्न विचारले. वास्तविक आतापर्यंत अनेक वेळा समितीच्या विविध कार्यकर्त्यांना हे प्रश्न विचारून पोलिसांनी चौकशी केली आहे आणि कार्यकर्त्यांनीही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. (पोलिसांनी धर्म आणि राष्ट्र रक्षणार्थ सनदशीर मार्गाने कार्य करणार्या संघटनांवर लक्ष ठेवण्यापेक्षा तीच शक्ती जिहादी आतंकवादी, फुटीरतावादी, देशविरोधक आणि त्यांचे समर्थक यांना शोधण्यासाठी वापरली, तर देश लवकर आतंकवादमुक्त होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
(म्हणे) अपप्रकार रोखण्यास पोलीस सक्षम आहेत ! – एका पोलीस अधिकार्याची प्रतिक्रिया
पिंपरी : चिंचवड परिसरात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते एका पोलीस ठाण्यामध्ये निवेदने देण्यासाठी गेले असता तेथील पोलीस निरीक्षकांनी तुम्ही काही सांगू नका. अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (पोलीस सक्षम असते, तर कार्यकर्त्यांना निवेदने देण्याचीही आवश्यकता पडली नसती. केवळ निवेदनाच्या माध्यमातून पोलिसांना सहकार्य करू इच्छित असतांना तेही घेऊ न शकणारे पोलीस कायदा-सुव्यवस्था उत्तम राखू शकतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) दुसर्या एका ठिकाणी भ्रमणभाष पहाण्यात मग्न असणार्या पोलिसाने निवेदन स्वीकारले; पण ते वाचण्याचेही कष्ट घेतले नाहीत; उलट तुमच्यावर सनातनचा प्रभाव वाटतो, अशी कार्यकर्त्यांना उद्देशून टिपणी केली. (सनातनचा प्रभाव असण्यामध्ये गैर काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अन्य एका पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देणार्या साधकांना तुम्ही निवेदन न देता तक्रार प्रविष्ट करा, मग आम्ही कारवाई करू, अशी प्रतिक्रिया एका पोलीस अधिकार्याने व्यक्त केली.
सार्वजनिक नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवण्याविषयी भोर पोलीस ठाण्यात निवेदन सादर
भोर : नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवण्यासाठी भोर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार पंकज मोघे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी सर्वश्री संकेत पिसाळ, युवराज मगर, मनोज नाझिरकर, गणेश नाझिरकर, सतीश उगले, वैभव वाडकर, श्रेयश गुंजोटीकर, सुरज साळुंखे, समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात