हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे देहली येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन
११३ वर्षांपूर्वी परकीय सत्तेने बंद केलेले हिंदूंचे मंदिर उघडण्यासाठी अजूनही हिंदूंना आंदोलन करावे लागणेे, हे हिंदूंसाठी दुर्दैव ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : कोणार्क सूर्यमंदिर उघडण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्र प्रकाश कौशिक यांच्या नेतृत्वाखाली दारा सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मुख्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन केले. या वेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे महासंचालक राकेश तिवारी आणि संस्कृतीमंत्री महेश शर्मा यांना निवेदन देऊन कोणार्क सूर्यमंदिर त्वरीत उघडण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना श्री दारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुकेश जैन म्हणाले, ओडिशातील पुरीच्या जवळ असलेले सूर्यमंदिर भगवान श्रीकृष्णाचे पुत्र साम्ब यांनी निर्माण केले होते. दिव्य शक्ती असलेल्या या मंदिराला वर्ष १९०३ मध्ये इंग्रजांनी रेती भरून बंद केले होते; कारण या मंदिराची दिव्य तांत्रिक शक्ती इंग्रजांच्या सागरी जहाजांना बुडवून टाकत होती. हे मंदिर बंद करण्यात आल्यावरच कोलकातापुरती मर्यादित असलेली इंग्रजांची सत्ता देशाला व्यापून वर्ष १९११ मध्ये देहलीला राजधानी करण्यात यशस्वी ठरली.
ओजस्वी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी ओमजी म्हणाले, हे मंदिर बंद केल्यानंतर ओडिशा, बंगाल या राज्यांसह संपूर्ण पूर्वोत्तर प्रदेशांत गरिबी आणि भूकमारी पसरली. नागालॅण्डचे हिंदु राजा जादोनंद यांना फासावर लटकवून सर्व नागा लोकांना इंग्रजांनी बलपूर्वक ख्रिस्ती केले. त्यामुळे पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी हे मंदिर उघडणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात