पाकमधील हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने दिलेल्या या लढ्याचा हा परिणाम होय ! भारतातील हिंदूंनी यातून बोध घ्यावा !
इस्लामाबाद : पाकच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हिंदू विवाह कायदा हे विधेयक अखेर संमत झाले. या विधेयकाच्या संमतीमुळे गेल्या ६६ वर्षांपासून हिंदूंच्या विवाहांच्या नोंदणीतील महत्त्वाचा अडसर दूर झाला आहे, तसेच पाकमधील अल्पसंख्यांक हिदूंच्या विवाहांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे. तलाक आणि बलपूर्वक धर्मांतर अशा प्रकारच्या समस्यांवर सहजपणे उपाय काढता येणार आहे. असे असले, तरी यातील काही जाचक अटींमुळे हिंदूंना त्रास होऊन धर्मांध त्याचा लाभ उठवू शकतात. (हिंदूद्वेषाने पछाडलेला पाक हिंदूंच्या मागण्या सहज मान्य करेल, अशी आशाच नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदु युवतींच्या अपहरणांना आळा बसण्याचा अंदाज !
पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या केवळ २ टक्के आहे. वर्ष १९९८च्या जनगणनेनुसार तेथे २५ लाख हिंदू आहेत. आतापर्यंत हिंदूंना विशेषत: महिलांना त्यांचा विवाह झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही कागदोपत्री पुरावा नव्हता. त्याचबरोबर पाकमधील हिंदू पुनर्विवाह, मूल दत्तक घेणे आणि उत्तराधिकारी नेमणे अशा प्रकारच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित होते. या नवीन कायद्यामुळे हे अधिकार त्यांना मिळणार आहेत. पाकमध्ये हिंदु महिलांचे अपहरण मोठ्या प्रमाणात होत होते. नवीन कायद्यामुळे या अपहरणाच्या घटनांना लगाम बसण्याची आशा आहे.
विधेयकात काही जाचक अटी अंतर्भूत !
भारतातील हिंदू विवाह कायदा आणि पाकिस्तानात होऊ घातलेला हिंदू विवाह कायदा यात अंतर आहे. पाक संसदेत संमत झालेल्या विधेयकातील तरतुदींनुसार विवाहानंतर १५ दिवसांच्या आत विवाहाची नोंदणी करणे आवश्यक आहे. (एवढ्या अल्प कालावधीत नोंदणी करणे शक्य नसल्यास, हिंदूंना अडचण येऊ शकते. पाकने जाणूनबुजून अशी तरतूद केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) भारतात अशाप्रकारचे बंधन नाही. पाकमध्ये आता हिंदु वधू-वराच्या लग्नाचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. पती-पत्नी एक वर्षाहून अधिक काळ एकमेकांसह रहात नसतील आणि त्यांना लग्न मोडायचे असेल, तर तसे करणे त्यांना शक्य होणार आहे. पतीच्या निधनानंतर ६ मासांनी विधवा पत्नीला पुनर्विवाहास अनुमती मिळेल. हिंदु व्यक्तीने पहिली पत्नी असतांना दुसरा विवाह केल्यास तो गुन्हा ठरणार आहे. (म्हणजे पाकमध्ये मुसलमान कितीही विवाह करणार आणि हिंदूंना मात्र त्याविषयी बंधन घालणार आणि हिंदु युवतींवर कुदृष्टी ठेवून त्यांना पळवणार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हिंदू विवाह नोंदणी नियमांचे उल्लंघन झाल्यास ६ मासांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. हिंदूंबरोबरच हा कायदा जैन, बौद्ध, शीख, पारसी आणि ख्रिश्चन यांना लागू होणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात