हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरवळ (जिल्हा सातारा) येथे व्याख्यानाचे आयोजन
शिरवळ : पूर्वीपासून धर्माचरण, संस्कृतीचे जतन, समाज संघटन आणि साधना म्हणून सार्वजनिक उत्सव साजरे केले जात होते; परंतु सध्या सार्वजनिक उत्सवांना विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. उत्सवात चित्रपटातील गीतांवर अंगविक्षेप करून गरबा खेळणे, मद्यपान, व्यभिचार, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, रोषणाईसाठी पैशांचा व्यय, जुगार खेळणे अशा प्रकारच्या अनेक अपप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. असे अपप्रकार थांबवून धार्मिकतेने आणि भावाच्या स्तरावर उत्सव साजरे केले, तरच उत्सवातील पावित्र्य टिकून राहील. तसेच उत्सवातील आनंद अनुभवता येईल, असे प्रतिपादन प्रा. विठ्ठल जाधव यांनी १ ऑक्टोबर या दिवशी येथील मंडई वसाहतीतील मंडईमाता नवरात्रोत्सव मंडळात आयोजित केलेल्या व्याख्यानात केले. या वेळी समितीचे श्री. सोमनाथ राऊत, सौ. छाया पवार आणि ३५ धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. या वेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रोत्सवात एक दिवस धर्मशिक्षण फलक प्रदर्शन लावण्यास सांगितले.
२. मंडळाने नवरात्रोत्सव विशेषांक आणि सनातननिर्मित ‘आरतीसंग्रह’ हा लघुग्रंथ विकत घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात