दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहर आणि संपादक प्रशिक्षण शिबिरास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !
रामनाथी (गोवा), ८ ऑक्टोबर (वार्ता.) – दैनिक सनातन प्रभात हे हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव दैनिक असल्याने वार्ताहर सेवेतून आपल्याला धर्माकार्याचीच संधी मिळत आहे. वार्ताहर सेवेतून स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करत चांगला वार्ताहर ते संत वार्ताहर असा प्रवास करण्याची ही संधी आहे. म्हणूनच पत्रकारिता ही साधना म्हणून करा आणि त्या दृष्टीने या सेवेचा अधिकाधिक लाभ करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले. येथील सनातन आश्रमात चालू झालेल्या वार्ताहर आणि संपादक प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
या शिबिराला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या वेळी सनातन प्रभात नियतकालिकाचे माजी समूह संपादक पू. (श्री.) पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि सनातन प्रभात नियतकालिकाचे समूह संपादक श्री. शशिकांत राणे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा प्रारंभ झाला. संपादक श्री. शशिकांत राणे यांनी उपस्थितांना शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, हिंदु ही एक शक्ती असून दैनिक सनातन प्रभात हे हिंदुहितरक्षक म्हणून कार्यरत आहे. अशा दैनिकाचे आपण वार्ताहर आहोत हे आपण सातत्याने लक्षात ठेवले पाहिजे. या शिबिराला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील ८५ हून अधिक साधक आणि धर्माभिमानी उपस्थित होते. या शिबिरात बातमी कशी करावी, बातमीवर संस्करण करणे आदी विषय शिबिरार्थींना शिकवण्यात येणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात