गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांना पोलिसांनी कह्यात घेतल्याचे प्रकरण
सातारा – गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी येथील दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांच्यावर आकसाने कारवाई करण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असा आदेश येथील उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येथील खाजगी मंगळवार तळ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे कारण पुढे करत भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केला होता. या संदर्भात तेथे कुटुंबियांसह मूर्ती विसर्जनासाठी आलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलिसांना समजावले आणि विविध प्रकारची कायदेशीर कागदपत्रे दाखवली; मात्र शाहूपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी वार्ताहर श्री. कोल्हापुरे यांनाच दमदाटी करून कह्यात घेतले होते. याविषयी माहिती मिळताच शहरातील हिंदुत्वनिष्ठ शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा झाले होते. या वेळी पोलिसांनी मंगळवार तळ्यामध्ये मूर्तीविसर्जन करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत हिंदुत्वनिष्ठांवरच अरेरावी केली, तसेच त्यांनी गणेशभक्त आणि श्री. कोल्हापुरे यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर या प्रकाराविरुद्ध समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात