मुंबई – येथे हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने नवरात्रोत्सव मोहिमेअंतर्गत चेंबुर, घोडपदेव, शिवडी, तुर्भे आणि वसई येथे ४ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विविध नवरात्रोत्सव मंडळांत प्रबोधनपर पथनाट्ये आणि स्वरक्षा प्रात्याक्षिके या माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. या वेळी रणरागिणी शाखेच्या वतीने सौ. नयना भगत यांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवांमागील शास्त्र, स्त्रियांवर होणारे अत्याचार, नवरात्रोत्सवांतील अपप्रकार रोखणे यांविषयी प्रबोधन केले. तसेच एक भारत अभियान काश्मीर की ओर या अभियानाचीही जागृती करण्यात आली.
चेंबूर येथील ओम साई गणेश मित्र मंडळ आणि जय अंबे मित्र मंडळ, तसेच घोडपदेव येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव संलग्न बाल गोपाळ मंडळ, शिवडी येथील बाळ मित्र सेवा मंडळ, तुर्भे येथील मराठा मित्र मंडळ सेक्टर २१, तसेच वसई येथील धर्मजागृती सेवा मंडळ, पाचुबंदर येथे काश्मीरमध्ये वाढत चाललेला देशद्रोह अन् महिलांवर वाढत चाललेले अत्याचार या विषयांवर पथनाट्ये आणि स्संरक्षणाची प्रात्याक्षिके सादर केली. याचा एकूण ७५० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.
सर्व ठिकाणी मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे उत्तम सहकार्य लाभले. अनेकांनी या वेळी धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात अनेक मंडळांत त्यांच्या मागणीनुसार पथनाट्ये आणि प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत.
क्षणचित्रे
१. येथील जय अंबे मित्र मंडळ यांनी दांडिया थांबवून पथनाट्ये आणि प्रात्यक्षिके यांचे आयोजन केले. मंडळातील महिलांनी धर्मशिक्षण वर्गासाठी स्वत:हून जागा बघणार असल्याचे सांगितले.
२. घोडपदेव येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव संलग्न बाल गोपाळ मंडळाने लव्ह जिहादचे २५ ग्रंथ मंडळात वाटण्यासाठी घेतले.
३. शिवडी येथील बाळ मित्र सेवा मंडळ यांच्या येथे धर्मशिक्षण वर्ग चालू होणार आहे.
४. तुर्भे येथील मराठा मित्र मंडळ सेक्टर २१ यांनी दांडिया थांबवून पथनाट्ये आणि प्रात्याक्षिके सादर करण्याची अनुमती दिली. याचा ३०० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. पथनाट्यामध्ये काश्मीरची भीषणता लक्षात येण्यासाठी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊन पथनाट्यास प्रारंभ झाला. त्यामुळे मंडळातील राष्ट्र्रप्रेमी मुलांनी संतप्त होऊन पाकिस्तान मुर्दाबाद, भारतमाता की जय, अशा घोषणा देऊन राष्ट्राभिमान जागृत ठेवला. या मंडळाचे श्री. संदीप गोळे, किरण राजपुरे, दत्ता शेलार, अक्षय सणस, नितीन जाधव आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. हे मंडळ कोणत्याही राजकीय पक्षाचे साहाय्य घेत नाहीत.
५. नवी मुंबई येथील समितीचे सर्वश्री पंकज आंबेरकर, वैभव साळुंंके, प्रसाद नाकील, वसंत सणस यांनी पुढाकार घेऊन तुर्भे येथे नियोजन केले होते.
६. शिवडी येथील बाळ मित्र सेवा मंडळाने काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे फॅक्ट प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात