इंदापूर नगरपरिषद आणि सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्याकडून हिंदूंच्या भावना पायदळी सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने अन्यत्र हलवण्याची धर्माभिमानी हिंदूंची मागणी !
इंदापूर (जिल्हा पुणे) : इंदापूर शहराचे ग्रामदैवत असणारे इंद्रेश्वर देवतेचे मंदिर, तसेच सिद्धेश्वर मंदिर यांच्या भितींना लागूनच सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी केली आहेत. विशेष म्हणजे सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट आणि नगरपरिषद यांनीच ही सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली आहेत. (मंदिरालागूनच स्वच्छतागृहांची उभारणी होणे, हा हिंदूंच्या धर्मशिक्षणाविषयी असलेल्या अज्ञानाचा परिणाम ! मंदिर हे केवळ दगडी बांधकाम नसून मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. अशा मंदिरांचे पावित्र्य जपणे, हे सर्व हिंदूंचे कर्तव्य आहे. अशा वेळी पावित्र्य जपणे तर सोडाच, उलट देवळाचा पावित्र्यभंग करणार्या जन्महिंदूंवर देवतेची कधीतरी कृपा होईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या प्रकारामुळे धर्माभिमानी हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या असून धर्माभिमानी श्री. रोहित भिसे यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने दुसरीकडे हलवण्याची, तसेच या घृणास्पद प्रकाराला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर मंदिर ट्रस्टने मंदिराचे पावित्र्य जपले नाही, तर त्यांच्यावरही धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे श्री. भिसे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात त्यांनी इंदापूर परिषदेचे मुख्याधिकारी, सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगररचना विभाग यांना मंदिरालगत सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून कलम २९५ प्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (मंदिराचे पावित्र्य जपले जाण्यासाठी कृतीशील झालेल्या श्री. रोहित भिसे यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी श्री. भिसे यांच्या पाठीशी उभे राहून स्वच्छतागृहे दुसरीकडे हलवण्यास, तसेच प्रायश्चित्त घेण्यास मंदिर ट्रस्ट आणि प्रशासन यांना भाग पाडले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात