मिरज – छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीची उपासना केली. त्यामुळे त्यांना देवीचे आशीर्वाद मिळून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. आजही आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात कृतीशील होण्यासाठी देवीची उपासना आवश्यक आहे. या अगोदरच्या शासनाने पाकिस्तानच्या विरोधात कधीच प्रत्युत्तर दिले नाही; मात्र भाजप शासनाने योग्य निर्णय घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, असे मार्गदर्शन रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी खिलारे यांनी केले. येथील मल्लिकार्जुन देवालयासमोर श्रीदुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी धारकर्यांसह शिवसेना, भाजप, विविध गणेश मंडळे, विविध संप्रदाय आणि विविध समाज यांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे नियोजन श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री सुनील ढोबळे, विनायक माईणकर, प्रमोद जाधव, बाळासाहेब विभूते, प्रसाद दरवंदर यांसह श्रीदुर्गामाता दौड संयोजन समितीने केले होते. तत्पूर्वी सकाळी डॉ. भोसले चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीदुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले. हे स्वागत डॉ. (सौ.) धनश्री भोसले यांनी केले. याचप्रकारे सौ. खिलारे यांनीही दौडीचे स्वागत केले.
क्षणचित्रे
१. सौ. गौरी खिलारे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले, पू. भिडे गुरुजी यांना वंदन करून केला.
२. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींना फसवण्याचे कार्य चालू आहे, यांसाठी आपण सतर्क असायला हवे, असे त्यांनी सांगितले. सौ. खिलारे यांच्या मार्गदर्शनानंतर काही युवतींनी प्रशिक्षणवर्गाची मागणी केली.
३. सौ. खिलारे यांनी उपस्थितांकडून राष्ट्र-धर्म यांसाठी कार्य करण्यासाठी, तसेच आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी सर्वांकडून प्रार्थना करवून घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात