Menu Close

अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) काळेगुरुजी यांच्या पार्थिवावर वेदमंत्रांच्या जयघोषात अग्निसंस्कार

p_nanaबार्शी (जिल्हा सोलापूर) – अश्‍वमेधयाजी प.पू. नारायण (नाना) गोविंद काळेगुरुजी (वय ८४ वर्षे) यांनी दसर्‍याच्या शुभदिनी म्हणजे ११ ऑक्टोबरला देहत्याग केला. त्यानंतर अश्‍विन शुक्ल पक्ष एकादशीला म्हणजे १२ ऑक्टोबरला सकाळी चार वेदांच्या मंत्रघोषात त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी देण्यात आला.

देहत्यागापूर्वी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी ३ वेळा आेंकार म्हणणे

११ ऑक्टोबरला प.पू. काळेगुरुजी यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यापूर्वी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या करतांना प.पू. नाना यांचा ३ वेळा आेंकार चालू झाला. त्यानंतर थोड्या वेळातच म्हणजे सायंकाळी ५.३० वाजता त्यांनी देहत्याग केला.

nana_kale_july2014_col
प.पू. नाना काळेगुरुजी

१२ ऑक्टोबरला सकाळी त्यांचे शेकडो भक्त, शिष्यगण आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता अंत्यविधीला प्रारंभ झाला. प.पू. नाना हे अग्निहोत्री असल्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या घरी नित्य अग्निहोत्र करण्यात आले. तद्नंतर गार्हपत्य, दक्षिणाग्नि, आहवनीय या तीन अग्नींनी मृताग्नीहोत्र करण्यात आले आणि याच अग्नीसह प्रेतसंस्कार विधी करण्यात आला. यानंतर श्रीराम नामाचा जयघोष आणि भजने यांसह त्यांच्या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. ही अंत्ययात्रा प.पू. नाना यांच्या शेतात पोचल्यावर तेथे अंत्यविधी, तसेच अंत्येष्टीविधी करण्यात आला.

त्यानंतर प.पू. नाना यांच्या पार्थिवाला त्यांचे ज्येष्ठ पुत्र अश्‍वमेधयाजी श्री. केतन काळेगुरुजी यांनी अग्नी दिला.

या वेळी प.पू. नाना यांच्या धर्मपत्नी पू. (श्रीमती) वैजयंती काळे, त्यांचे पुत्र वेदमूर्ती योगेश काळे, वेदमूर्ती चैतन्य काळे, स्नुषा, नातवंडे आणि आप्तेष्ट, तसेच अकलूज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब मोहिते पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही.वाय्. यादव, सद्गुरु प.पू. गुळवणी महाराज यांचे भक्तगण, ब्राह्मण महासभा, ज्येष्ठ नागरिक संघ आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा उत्तम संगम असलेले प.पू. नाना काळेगुरुजी यांनी १० डिसेंबर २०१२ या दिवशी संतपद गाठणे

प.पू. नाना काळेगुरुजी यांनी संतपद गाठल्याचे १०.१२.२०१२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात घोषित करण्यात आले होते. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्ते प.पू. नाना यांचा सन्मान करण्यात आला होता. या वेळी शक्तिपात योगाचे अधिकारी नाशिक येथील प.पू. नारायणराव ढेकणे महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. शरदराव जोशी यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली होती. या सन्मान सोहळ्याच्या वेळी प.पू. नाना यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, प.पू. नाना काळेगुरुजी यांच्यामध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा उत्तम संगम आहे. पौरोहित्य केल्यामुळे त्यांच्यामध्ये ब्राह्मतेज निर्माण झाले आहे आणि मंत्रांतील शक्तीमुळे अनिष्ट शक्तींचा नाश होतो. त्यामुळे त्यांच्यात क्षात्रतेजही आहे.

प.पू. नाना काळेगुरुजी यांच्यातील चैतन्य यापुढेही अखंड प्रक्षेपित होत राहील आणि या चैतन्याच्या बळावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, हे निश्‍चित !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांत महत्त्वाचे बळ म्हणजे आध्यात्मिक बळ होय. ते संतांकडे असते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कलियुगात १६०० वर्षांनंतर २ वेळा अश्‍वमेध आणि अनेक वेळा सोमयाग करणारे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी हे एकमेवाद्वितीय होते. ऋषिमुनींच्या कार्यात विघ्ने आणणार्‍या असुरांचा नायनाट करण्यासाठी ज्याप्रमाणे ईश्‍वर विविध अवतार घेऊन धावून येतो, त्याप्रमाणे सनातनच्या समष्टी कार्यात विघ्ने आणणार्‍या अनिष्ट शक्तींपासून साधकांचे रक्षण होण्यासाठी अनेक संत धावून आले. त्यातील एक म्हणजे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळे हे होते.

संत संकल्पाने किंवा अस्तित्वाने कार्य करतात. प.पू. नाना काळे गुरुजी यांचेही वैशिष्ट्य हे की, ते याज्ञिक होते आणि त्याचबरोबर संतही होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या धार्मिक विधींचा परिणाम अनेक पटींनी अधिक होत असे. त्यांच्या यज्ञ-यागांच्या संदर्भात अनेकांना अनेक अनुभूतीही आल्या आहेत, तसेच समष्टी कार्यालाही मोठा लाभ झाला आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची ओढ तीव्र असल्यामुळे प.पू. नाना वयाच्या ८२ व्या वर्षीही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीहून गोव्यातील रामनाथी आश्रमात येऊन सोमयाग केला. प.पू. नाना यांनी जरी देहत्याग केला असला, तरी त्यांच्यातील चैतन्य यापुढेही अखंड प्रक्षेपित होत राहील आणि या चैतन्याच्या बळावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, हे निश्‍चित ! अशा या थोर विभूतींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *