हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळेला केल्या जाणार्या पूजेवरही गुन्हा नोंदवणे, ही धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपीच होय !
चेन्नई – येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु मक्कल कत्छी (हिंदू जनता पक्ष)चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी दसर्याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र स्वतःच्या फेसबूक पानावर ठेवले होते. त्यावरून २ धर्मांमध्ये शत्रूत्व निर्माण केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात कलम १५३(ए) आणि २५(ए) नुसार हा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. यानंतर श्री. संपथ यांनी ही छायाचित्रे फेसबूक पानावरून काढली आहेत.
येथील काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. यामुळे समाजात अशांतता निर्माण होते, असा त्यांनी दावा केला आहे. तसेच श्री. संपथ यांच्याकडे शस्त्र बाळगण्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या आरोपांवर श्री. संपथ म्हणाले की, त्या बंदुका नव्हत्या, तर मुलाची खेळणी होती आणि ज्या धातूच्या वस्तू होत्या त्या भेट म्हणून मिळाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात