चला गाजवूया ही विराट हिंदु धर्मजागृती सभा ।
काश्मिरी हिंदूंच्या मागे आता, शिवरायांचा मावळा आहे उभा ।
येतो आहे काश्मीरला हा शिवरायांचा मावळा । धर्मांधांनो, आता काश्मीर सोडून पळा ॥
-
पुणेकरांमध्ये धर्मजागृती सभेची उत्सुकता
-
व्हॉट्स अॅप, ट्विटर, फेसबूक यांसारख्या सामाजिक
-
संकेतस्थळांच्या माध्यमातून सर्वत्र सभेची चर्चा
-
राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे – जिहादी आतंकवादाने होरपळलेल्या काश्मिरी हिंदूंना देशभरातील धर्मबांधवांचा भरभक्कम पाठिंबा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांचा विशेषतः युवकांचा आणि महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका घेणे, महिलांच्या बचतगटांमध्ये सभेची माहिती सांगणे या पारंपारिक प्रसारपद्धतीच्या जोडीला व्हॉट्स अॅप, ट्विटर, फेसबूक यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सभेचा प्रसार करण्यात येत आहे. त्याद्वारे आतापर्यंत लक्षावधी लोकांपर्यंत सभेचा विषय पोचला असून समाजाच्या सर्वच स्तरांतून राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली जात आहे.
सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे कश्यप ऋषींची भूमी असलेल्या काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद फोफावला. त्याची परिणती पुढे साडे चार लक्षाहून अधिक काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनात झाली. गेली २६ वर्षे या दुर्दैवी स्थितीत पालट झालेला नाही. त्यामुळेच आता काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी देशभरातील धर्मबांधवांचे संघटन उभे रहावे, या उद्देशाने देशभरात एक भारत अभियान – चलो कश्मीर कर ओर या अभियानाच्या अंतर्गत विविध ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात येत आहेत. पनून कश्मीर, हिंदु जनजागृती सभा, काश्मिरी हिंदू सभा, लष्कर-ए-हिंद, हिंदु एकता आंदोलन या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात २३ ऑक्टोबर या दिवशी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे, कलम ३७० रहित करण्यात यावे, या मागण्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वनिष्ठ नेते या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी योगदान देऊ इच्छिणार्यांनी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे, तसेच सभेत सहभाग नोंदवण्यासाठी ०२० – ४९१३१३१२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रासाठी योगदान देण्याची अंध विद्यार्थ्यांची तळमळ !
सदाशिव पेठेतील अण्णाभाऊ साठे अभ्यासिकेच्या जवळ एका परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ३५ हून अधिक अंध विद्यार्थी उपस्थित होते. समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना सभेची माहिती सांगितल्यावर काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन कार्यकर्त्यांना सांगितले, सर, आम्ही पुण्याबाहेरचे विद्यार्थी आहोत. सध्या शिक्षणासाठी वसतीगृहात रहात आहोत. तुम्ही आमच्या वसतीगृहात येऊन तेथील विद्यार्थ्यांनाही सभेची माहिती सांगा. आम्हालाही राष्ट्र आणि धर्म कार्य करायचे आहे. आम्ही कार्यात कसे सहभागी होऊ शकतो, ते आम्हाला सांगा. (अंध विद्यार्थ्यांची ही राष्ट्रभक्ती आणि तळमळ मी आणि माझे या संकुचित वृत्तीत अडकलेल्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
वैशिष्ट्यपूर्ण !
१. पिरंगुट येथील ग्रामसभेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी सभेचा विषय सांगितल्यानंतर उपस्थित सरपंच, उपसरपंच, तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य यांनी काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे, यासाठी ठराव केला.
२. अनेक हिंदुत्वनिष्ठ, तसेच लोकप्रतिनिधी यांनी सभेच्या प्रसारासाठी होर्डिंग्ज, तसेच फ्लेक्स लावण्याचे ठरवले. आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी सभेच्या प्रसारासाठी २५ होर्डिंग्ज लावणार असल्याचे सांगितले.
३. जिल्ह्यातील जवळपास ४० गावांमध्ये सभेचा प्रसार चालू आहे. अनेक जणांनी उत्स्फूर्तपणे गाड्या करून सभेला येणार असल्याचे सांगितले.
४. मंदिरे, व्यायामशाळा, वसतीगृहे, अधिकोष, तरुणमंडळे, बचतगट, अभ्यासिका, शिकवण्या, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांकडून सभेचा प्रसार केला जात असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विराट हिंदु धर्मजागृती सभा
स्थळ : न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे मैदान, शनिवार पेठ, पुणे.
दिनांक : २३ ऑक्टोबर
वेळ : सायंकाळी ५.३०
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात