वॉशिंग्टन : ‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या धोरणांमुळेच इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला,’ असा आरोप उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या शर्यतीत आहेत. प्रचारासाठी मिसिसिपीमध्ये आपल्या समर्थकांपुढे ट्रम्प बोलत होते.
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेश बंदी करण्याचे आवाहन केले होते. दहशतवादाच्या निर्मूलनासाठी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांनाच ठार केले पाहिजे, या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमेरिकेसह जगभरातील देशांनी टीका केली होती. अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवादी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत ट्रम्प यांच्या वक्तव्याचा समावेश होता. हिलरी यांनी ट्रम्प यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ओबामा आणि हिलरींच्या धोरणांमुळेच इस्लामिक स्टेटचा जन्म झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांच्या मध्य पूर्वेतील धोरणांवर तसेच २००३मध्ये इराकमधील सहभागाच्या निर्णयावरही टीका केली आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स