मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मोर्चेकर्यांच्या मागण्या !
कोल्हापूर : भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात चालेन तर वाघासारखेच असे सांगत मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, या प्रमुख मागण्यांसाठी १५ ऑक्टोबर या दिवशी येथे भव्य मराठा क्रांती मोर्चा काढला. या मोर्च्यात लक्षावधी संख्येने लोक सहभागी झाले होते.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव येथून मोठ्या संख्येने लोक मोर्च्यात सहभागी झाले होते. सीमा भागातून आलेले २१ नगरसेवक आणि नागरिक यांच्या समवेत बेळगाव येथील महापौर श्रीमती सरिता पाटील या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या.
मोर्च्यात खासदार छत्रपती संभाजाराजे, खासदार छत्रपती उदयनराजे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांसह आमदार आणि नेते सहभागी झाले होते. मोर्च्यामुळे बंगळुरू-मुंबई महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा ! – खासदार उदयनराजे भोसले
मराठा समाज लक्षावधी संख्येत रस्त्यावर उतरला आहे. शासनाने याची नोंद घेण्याची आवश्यकता आहे. समाजाचा संताप अधिक वाढू न देता मराठा आरक्षणावर तात्काळ निर्णय घ्यावा.
क्षणचित्रे :
१. या मोर्च्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
२. कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात पालट करावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी, या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते.
३. सकाळी ८ वाजल्यापासून चालू झालेल्या लगबगीने सकाळी १० वाजता सायबर चौकात केवळ एक मराठा लक्ष मराठा दिसू लागला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात