मुंबई उच्च न्यायालयाची राष्ट्रीय तपास यंत्रणेला विचारणा
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरील सगळे आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएने) मागे घेतलेले असतांनाही त्यांना कारागृहात कसे काय ठेवले आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपिठाने केली. तसेच या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने प्रविष्ट केलेले आरोपपत्र आणि जामीन नाकारण्याच्या विशेष न्यायालयाची प्रत सादर करण्याचे आदेशही खंडपिठाने १४ ऑक्टोबर या दिवशी दिले आहेत.
१. तपास यंत्रणेने नव्याने प्रविष्ट केलेल्या पुरवणी आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवर साध्वी प्रज्ञासिंह यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; परंतु साध्वी या स्फोटाच्या कटात सहभागी होत्या, याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे स्पष्ट करत विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला, तसेच यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. या निर्णयामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनाची मागणी केली आहे.
२. उच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळी तपास यंत्रणेच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे हाती न लागल्यानेच त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यावर दोषारोप करणारे आतंकवादविरोधी पथकाचे आरोपपत्रही चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. (असे आहे, तर या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा आतंकवादविरोधी पथकावर कारवाई करण्याची मागणी करेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. हे खूप आगळीक प्रकरण असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सगळ्या आदेशांच्या प्रती, अन्य सर्व मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात