भुसावळ : मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जमियत उलमा ए हिंदच्या नेतृत्वात शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीमांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना देण्यात आले.
शहरातील खडका रोडवरील रजा टॉवरपासून सकाळी १०़३० वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली़ मोर्चेकऱ्यांच्या हातात ‘आमचा हक्क आम्हाला द्या’ या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी साडेनऊ वाजेपासून शहर व तालुक्यातील मुस्लीम रजा टॉवर भागात जमायला सुरुवात झाली.
सकाळी ११़१५ वाजेच्या सुमारास मोर्चेकरी प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचले़ प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना आठ मौलवींच्या शिष्ट मंडळाने आरक्षणासंदर्भात निवेदन दिले़.
मूक मोर्चात सुमारे १५ हजारांवर मुस्लीम सहभागी झाले होते़ नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, रऊफ खान, जलील कुरेशी, मुन्ना तेली, आशिक खान, ईस्माईल गवळी, शफी पहेलवान, नईम पहेलवान, मुन्वर खान, अफसर खान, आरीफ शेख गनी, साबीर मेंबर यांच्यासह हजारो मुस्लीम सहभागी झाले.
बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक मारोती मुळूक, मनोज पवार तसेच शहरचे निरीक्षक वसंत मोरे, तालुक्याचे बाळासाहेब गायधनी, उपनिरीक्षक सचिन खामगड, नशिराबादचे सहा़निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला़
यावलसह बोदवडलाही मोर्चा
आरक्षणाच्या मागणीसाठी यावलसह बोदवड येथेही मूक मोर्चा काढण्यात आला़ यावल येथील चोपडा रोडवरील इंदिरा गांधी हायस्कूलपासून मंगळवारी सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात झाली़ तहसीलदार कुंदन हिरे यांना पाच महिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले तर बोदवड शहरातील आखाडा मोहल्ला भागातून सकाळी १०़३० वाजता मोर्चाला सुरुवात झाली़. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
हिंगोली : आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजानेही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून तब्बल तीन तास जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. तसेच विविध प्रकारच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यात विविध भागातून आलेले मुस्लिम मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शरियतमध्ये शासनाने दखलंदाजी करू नये, एक्सा सिव्हील कोर्ट लागू करू नये, समान नागरी कायदा लागू कर नये आदी मागण्यांसदर्भात मोर्चातील प्रमुखांनी भाषणे केली. धर्मगुरुंच्या नेतृत्वात हा समाज एकवटला होता. मेहराजुल उलूम चौक येथून हा मोर्चा निघाला आणि गांधी चौक, इंदिरा गांधी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे दुपारी १२.३० ला पाेहाेचला. तेथे मुस्लिमांनी धरणे देत समाजातील मान्यवरांनी समुदायाला मार्गदर्शन केले. यात मान्यवरांनी समाजाला आरक्षणाची असलेली गरज प्रकट करीत शरियतमध्ये दखलंदाजी करू नये, समान नागरि कायदा लागू करू नये आदी मागण्या केल्या. शेवटी काही मुलांच्या हस्ते जमियत उलेमा-ए-हिंद जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
संदर्भ : लाेकमत